जिल्ह्यात दुर्दैवी अपघात, चार युवक ठार, दोघे जखमी

123

गडचिरोली, ता. ७ : सारे जग साखरझोपेत असताना शुक्रवार ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ५. ३० वाजता गडचिरोली-आरमोरी महामार्गावर काटली गावाजवळ भयानक दुर्दैवी अपघात घडला. व्यायाम करत असलेल्या सहा युवकांना भरधाव ट्रकने चिरडले. त्यापैकी दोघे जागीच ठार झाले, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरीत दोघांना तातडीने नागपुरला हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे या अपघातानंतर शोकसंतप्त नागरिकांनी या महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यात दौऱ्यानिमित्त आलेले राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह तातडीने अपघातस्थळी भेट दिली व मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आंदोलकांशीही संवाद साधला.गडचिरोली- आरमोरी महामार्गावरील काटली गावाच्या नाल्याजवळ सहा मुले व्यायाम करत असताना अज्ञात ट्कने त्यांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात सहा युवकांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अन्य दोन जखमी मुलांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतांमध्ये टिंकू नामदेव भोयर (वय १४), तन्मय बालाजी मानकर (वय १६), रा. काटली यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुशांत दुर्योधन मेश्राम (वय १५) व तुषार राजेंद्र मारभते (वय १३) रा. काटली या दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्षितीज तुळशिदास मेश्राम (वय १३), आदित्य धनंजय कोहपरे (वय १४) रा. काटली हे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डल राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. तसेच जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या दु:खद घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक मदत तातडीने पुरवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून संबंधित यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांशी शिक्षण मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी घटनास्थळी संवाद साधला. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. “दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन तुमच्या सोबत असून योग्य ती मदत आणि कारवाई केली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले. गावकऱ्यांनीही यावेळी आपल्या व्यथा मांडल्या आणि महामार्गावरील वाहतुकीच्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली. या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांना मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून चार लाख रुपये मदत घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण विभागाने अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा नियमाप्रमाणे देय लाभ मृतांच्या परिवाराला तत्काळ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या अपघातातील गंभीर जखमी युवकांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यकता असल्याचे कळताच लॉईड्स मेटल्सतर्फे तत्काळ स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले. विशेष म्हणजे लॉईड्स मेटल्सने यापूर्वीसुद्धा सामाजिक जाणिवेचा परिचय देत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. नुकतेच २ ऑगस्ट रोजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः हेलिकॉप्टरने हृदयविकाराचा झटका आलेले पोलिस नाईक राहुल गायकवाड यांना हेडरीहून नागपूरला उपचारासाठी पोहचवले होते. या भीषण अपघातामुळे जिल्हाभरात शोककळा पसरली आहे.

 

#RoadAccident

#TragicIncident

#BreakingNews

#IndiaNews

#MaharashtraNews

#SadNews

#YouthTragedy

#Gadchiroli

#GadchiroliNews

#KatliVillage

#GadchiroliAccident

#GadchiroliUpdates

#आरमोरीमहामार्ग

#गडचिरोलीदुर्घटना

#RIP

#RestInPeace

#PrayersForVictims

#JusticeForVictims

#SupportTheFamilies

#WeStandWithGadchiroli

#DevendraFadnavis

#DadajiBhuse

#MaharashtraGovernment

#EmergencyResponse

#HelicopterSupport

#LloydsMetals

#ViralNews

#NewsAlert

#TodayNew