ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ८ : गडचिरोलीपासून जवळच असलेल्या काटली येथे ट्रकच्या धडकेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरूमच्या इमारतीची भिंत व स्लॅबचा काही भाग कोसळल्याने मलब्याखाली दबून तीन जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार (ता.८) संध्याकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
आकाश ज्ञानेश्वर बुराडे (वय २५) रा. निलज, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, तहसीन इस्राईल शेख (वय ३०) व अफसान शेख (वय ३२, दोघेही रा.देसाईगंज, जि. गडचिरोली, अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सौरभ चौधरी (वय २५) रा. मेंडकी, विलास मने (वय ५०) व दीपक मेश्राम (वय २३) दोघेही रा. आरमोरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.आरमोरी येथे पंचायत समिती जवळच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीची शोरूम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरूम सुरू होती. शुक्रवारी तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते, तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी व नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. संध्याकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानक इमारतीची मागची भिंत व स्लॅबचा काही भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते. तिन्ही जखमींची हाडे तुटली असून त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गुरुवार (ता ७) गडचिरोलीनजीकच्या काटली येथे ट्रकने धडक दिल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी आरमोरीत इमारत दुर्घटनेत तीन जणांना प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
———————————–










