जन्माष्टमीला गडचिरोलीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार, कृष्णजन्माचा आनंद सोहळा

221

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १७ : कान्हा, गोवर्धन गिरीधारी अर्थात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली.

गडचिरोली शहरात आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धेत डी.जे. च्या तालावर ठेका धरत थरावर थर चढवत असलेल्या गोविंदांना बघत अवघी गडचिरोली नगरीही कृष्णमय झाली. शहरात एकीकडे श्रावणसरी बरसत होत्या तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्यासाठी सरसावलेल्या गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कयाच श्रावणसरींमध्ये डीजेच्या तालावर थिरकणारे गोविंदा, दहीहंडीसाठी थरावर थर लावून उंचावरची दहीहंडी फोडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत होते.’जय श्रीराम’, ‘जय श्रीकृष्ण’ असा जयघोष आणि त्यांचा उत्साह वाढवणारे प्रेक्षक यामुळे सगळीकडे आनंदी ,भक्तीमय वातावरण होते. गोपाळकाल्यानिमित्त जिल्हाभरात विविध ठिकाणी दहीहंडी स्पर्धा रंगल्या. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी पूजा, आरती, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मध्यरात्री उपवास सोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडले. मुख्य दहीहंडी स्पर्धेत शहराच्या विविध भागातील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला. यामध्ये इंदिरानगर, लांजेडा, राममंदिर सर्वोदय वॉर्ड, रामनगर, शिवाजी वॉर्ड विवेकानंद नगर, आयटीआय चौक विसापूर, गोकुलनगर- चनकाईनगर आणि हनुमान वॉर्ड तेली मोहल्ला या संघांचा समावेश होता. रात्री १० पर्यंत स्पर्धा सुरू होती. विजेता कोण ठरणार, याची उत्सुकता होती. गडचिरोली येथे चंद्रपूर मार्गावरील मैदानावर शनिवार (ता. १६) सायंकाळी दहीहंडी स्पर्धा पार पडली. सर्व कौशल्य पणाला लावून दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदा दंग झाले होते. भगवान श्रीकृष्णाच्या पूजेनंतर दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, रामायणजी खटी, अनिल तिडके, अनिल कुनघाडकर, अविनाश विश्रोजवार, तिलोत्तमा हाजरा , नितेश खडसे ,आयोजन समितीचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली शहरात आयोजित मुख्य स्पर्धेत दहीहंडी फोडणाऱ्या स्पर्धक संघाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यातर्फे ५१,१११ रुपयांचे प्रथम बक्षीस घोषित करण्यात आले होते. पण आठपैकी एकाही संघाला दहीहंडी फोडता आली नाही. अखेर सगळे संघ, आयोजक, पोलिस बांधव सर्वांनी एकत्रित येत ही दहीहंडी फोडली. त्यामुळे या स्पर्धेचा विजेता कोणी एक नसून सारेच संघ ठरले आहे. म्हणून दहीहंडीच्या पुरस्काराची रक्कम आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात सर्वच संघांना विभागून देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अनिल तिडके यांनी दिली.

———————————-