ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३ : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू उत्पादन, विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध घातला असताना जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील एका महिलेच्या घरातच चक्क सुगंधित तंबाखूचा कारखानाच थाटण्यात आला होता. त्यावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूसह ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवार (ता. २) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, १५ दिवसांपूर्वी मौजा डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली येथील रेखाबाई सडमाके यांच्या राहते घरी आरोपी ओमप्रकाश गेडाम, रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली व इतर चार जणांनी मशिनच्या साहाय्याने सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता अवैध कारखाना सुरू केला होता. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वरीष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक डार्ली येथे रवाना झाले. गोपनीय माहितीमध्ये नमूद महिला रेखाबाई सडमाके ( वय ४२) रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली हिच्या घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलिस पथकाने तिच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्या घरामध्ये सुगंधित तंबाखूने भरलेल्या टिनाच्या डब्यांचे विविध बॉक्स व सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य आढळून आले. सर्व सुगंधित तंबाखू व साहित्य जप्त करण्यात आले. २ राखडी खर्ड्याच्या बॉक्समध्ये६५ नग मजा १०८ हुक्का शिश तंबाखू कंपनीचे भरलेले २०० ग्रॅम वजनाचे टिनाचे डब्बे, प्रति डब्बा अवैध विक्री किंमत २००० प्रमाणे एकूण १, ३०, ००० रुपये, मजा १०८ हुक्का – शिशा तंबाखू कंपनीचे १० खर्ड्याचे बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये ५० ग्रॅम वजनाचे १० नग टिनाचे डब्बे, असे एकूण १०० नग टिनाचे डब्बे, अवैध विक्री किंमत ३०० रुपयेप्रमाणे एकूण किंमत ३०,००० रुपये. पांढऱ्या रंगाच्या चुंगळीमध्ये कच्चा तंबाखू असलेले २४ नग चुंगळी, प्रत्येक चुंगळीमध्ये ३ कि.ग्रॅ. वजनाचे ९६ प्लास्टिक असे एकूण २८८ कि.ग्रॅ. अवैध विक्री किंमत १००० रुपये प्रमाणे एकूण किंमत २,८८००० रुपये, निळ्या रंगाची २०० ग्रॅम वजनाचा मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू पॅकींग करण्याची लोखंडी मशिन अंदाजे किंमत ८०, ००० रुपये ५० ग्रॅम वजनाचा मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू टिनाचा डब्बा पॅकींग करण्याची इलेक्ट्रीक मोटर असलेली लोखंडी मशिन अंदाजे किंमत १,१०,००० रुपये, होला हुक्का शिशा तंबाखू प्लास्टिक पिशवी पॅकींग करण्याची लोखंडी मशीन अंदाजे किंमत ६५००० रुपये, हिमालया बॅग क्लोजर प्लास्टिक चुंगळी शिलाई मशीन अंदाजे किंमत ५०, ००० रुपये, इलेक्ट्रीक वजन काटा अंदाजे किंमत १५०० रुपये होला हुक्का शिशा तंबाखू पॅकींग करण्यासाठी वापरलेली फिलीप्स कंपनीची हेअर स्ट्रेटनर २ नग, प्रत्येकी किंमत २००० रुपये प्रमाणे एकूण ४००० रुपये, इतर रिकामे टिनाचे डब्बे, टिनाच्या डब्याला सिल करण्याकरिता वापरला जाणारा सील, टिनाचे गोल झाकण, प्लास्टिक टेप (चिकटपट्टी), पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पट्ट्या, कागदी खर्ड्याचे बॉक्स, प्लास्टिक, हिरव्या रंगाची प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक पाऊच, स्टिकर्स आदी साहित्य अंदाजे किंमत १२, २०० रुपये, असा एकूण ३, ३१,००० रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आणि एकूण ४, ५३, २०० रुपयांचा सुगंधित तंबाखू तयार करण्याकरिता लागणारे मशीन व इतर साहित्य असा एकूण ७, ८४, २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलिस स्टेशन आरमोरी येथे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ओमप्रकाश शंकर गेडाम याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष कडाळे करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, पोलिस हवालदार प्रेमानंद नंदेश्वर, पोलिस अंमलदार राजकुमार खोब्राागडे, रोहित गोंगले, चालक पोलिस अंमलदार गणेश पवार यांनी पार पाडली.
—————-










