ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ६ : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा, यासाठी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाकडून योग्य ती खबरदारीची पाऊले उचलण्यात आलेली आहेत.
त्याअंतर्गत बी.एन.एस.एस. कलम १६३ (२) अन्वये कायदा व सुव्यवस्था भंग करण्याची शक्यता असलेल्या ७७ सराईत गुन्हेगारांना गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये कुरखेडा ५, वडसा ११, कोरची ३, गडचिरोली ९, आरमोरी १९, चामोर्शी ४, अहेरी ११, मुलचेरा ५, आष्टी ९ व रेपनपल्ली उप पोलिस स्टेशन येथील १ अशा प्रकारे विविध पोलिस स्टेशन व उप पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण ७७ सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन, अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच समाजातील शांतता भंग करणारी कृत्ये आदी प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होऊ नये या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नागरिकांना सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता, बंधुता आणि सामाजिक सौहार्द राखून उत्सव साजरा करावा तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी यांनी केली आहे.
————————










