गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर

67

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : गडचिरोली पोलिस दलाकडून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकी प्रोजेक्ट उडानअंतर्गत भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून ‘भारत कृत्रिम अंग निर्माण निगम’ (एलिम्को), मुंबई यांच्या सहकार्याने ११ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिस मुख्यालय परीसरातील एकलव्य हॉल येथे तसेच १२ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिस उप-मुख्यालय, प्राणहिता येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरणे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाकडून ज्येष्ठ नागरिकांची वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारिरीक अडचणींकरिता तपासणी करण्यात आली. या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार दैनंदिन कामकाज सुसह्र होण्यासाठी गरजेचे असलेल्या विविध उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. दोन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावांमधील उत्तर विभागातील ८५० व दक्षिण विभागातील ४५० असे एकूण १३०० ज्येष्ठ नागरीकांची तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, चालण्याची काठी, वॉकर, श्रवणयंत्र, कुबड्या, कमरेचा पट्टा अशा विविध सहायक उपकरणांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच शिबिरादरम्यान एकूण २०७ लाभार्थ्यांना व्हिएलईमार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड आदी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले विविध उपकरणे वाटप केल्याने त्यांच्या जीवनाला एक नवीन सुरुवात मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यात नक्कीच मदत होणार आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात, यासाठी गडचिरोली पोलिस दल सदैव प्रयत्नशील राहिल. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या छोट्यात छोट्या समस्या सोडविण्यासाठीदेखील गडचिरोली पोलिस दल नेहमीच तत्पर असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. या शिबिरादरम्यान पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे तसेच पोलिस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनिल मडावी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे ऑडीओलॉजीस्ट डॉ. संदीप मोटघरे, एलिम्को, मुंबईचे ऑर्थोटिक्स अँड प्रोस्थेटिक्स डॉ. संकेत डेरवणकर, कॅम्प कॉर्डिनेटर हर्ष विश्वकर्मा, इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग विकास कुमार हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे सर्व अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व पोलिस अंमलदारांनी सहकार्य केले.

—————–