पंच परीवर्तन सुत्रे स्विकारण्याचे माजी आमदार डाॅ. देवराव होळी यांचे आवाहन

97

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १८ : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती १५ नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून आदिवासी (जनजाती) गौरव दिवस वर्षभर साजरा होणार आहे. या अनुषंगाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नई दिल्लीच्या माध्यमातून पंच परीवर्तन सुत्रे राबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. देवराव होळी यांनी शुक्रवार (ता. १७) पत्रकार परीषदेत दिली.

स्थानिक सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परीषदेत माहिती देताना माजी आमदार डाॅ.देवराव होळी म्हणाले की, देशातील आदिवासी समाज बांधवांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी १५ नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त देशामध्ये जनजातीय गौरवदिन म्हणून सामाजहित व सर्वांगीण विकासाकरिता पंच परिवर्तनाची पाच सुत्रे आदिवासी बांधवानी स्वीकारावी. आपणही हा दिवस एक मोठा उत्सव म्हणून साजरा करतो. असे दुसरे काही महत्त्वपूर्ण दिवसही आहेत जे आपण उत्सवासारखे साजरे करत असतो, परंतु केवळ अशा उत्सवांमधून आपल्या समाजाचा विकास होईल का? त्यातून आपल्या समाजाला योग्य दिशा मिळणार का? आपल्या समाजातील ४५ जमाती एकत्र येतील का? आपला समाज आत्मनिर्भर बनेल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आजही आदिवासी समाजाबद्दल निरंतर, सतत चिंतन, आचार-विचार होऊनही समाजाला योग्य दिशा मिळाल्याचे दिसून येत नाही. आदिवासी समाज आजही भरकटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यातही आपल्या अनेक समाजसुधारकांनी, विचारवंतांनी समाजाला एकत्रित करण्यासाठी, सक्षम सबळ, समर्थ, एकात्म समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यांचे प्रयत्न हे खरोखरच अभिनंदनीय आहेत. परंतु हे प्रयत्न अपुरे आहेत, याकरिता समाजातील हुशार, विद्वान-बुद्धिवान, सामाजिक विचारवंत, लेखक, इतिहासकार यांना याबाबत पुन्हा नव्याने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज आपला समाज अनेक वाईट चालीरीतीच्या मागे भरकटत चालला आहे. अडाणी, अशिक्षितपणा असल्याने अनेक लोक वाईट चालीरीती व प्रथांचा अंगीकार करत आहेत. ते आपल्या व्यवहारात आणत आहेत. त्यामुळे अशा भटकत चाललेल्या समाजाला त्याची जाणीव करून देऊन त्यांना योग्य दिशेला आणण्यासाठी १५ नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शासकीय सामाजिक उपक्रमांचे औचित्य साधून पंच परिवर्तन सूत्रांच्या माध्यमातून समाजात नवीन क्रांती घडविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजामध्ये ही सुत्रे राबविण्याची आवश्यकता आहे. आदिवासी समाज हा या देशाचा गाभा असल्याने ही ५ सूत्रे आपल्या आदिवासी समाजासाठी नवीन नाहीत. ही पंचसूत्री तर आपल्या समाजाचे मूलमंत्रच आहे. आपल्या चिरंतन संस्कृतीमध्ये जुन्या चालीरीती, रूढी परंपरांमध्ये त्याची मुळे आपणास दिसून येतात. मात्र काळाच्या ओघात कुठेतरी त्याचे विस्मरण होत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी पंच परीवर्तनाचे सुत्र काय आहे ते आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. या पत्रकार परीषदेला अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सूरज मडावी, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, वडसाचे अध्यक्ष भूषण अलोने, गडचिरोलीच्या महिला तालुकाध्यक्ष लीना कोकोडे, शहराध्यक्ष निलेश आत्राम, सदस्य अमित तलांडे, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विधा दुग्गा आदी उपस्थित होते.कुटुंब प्रबोधनातून शाश्वत आणि सक्षम निर्माण करणे, पर्यावरण व्यक्तीगत पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करणे, सामाजिक समरसतेतून परस्परपूरक जगण्याचा विषय व्हावा आणि स्नेहमय सामाजिक संबंध जोपासणे, सामाजिक व व्यक्तीगत जीवनातील भेदभाव संपविणे, नागरी कर्तव्य, देशभक्ती बरोबर सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे, स्व-जागृती, स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-देशी, स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्याला विकसित करणे ही पंच परीवर्तनाची सुत्रे आहेत, अशी माहिती माजी आमदार डाॅ.देवराव होळी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

———————