सरकारी जागेवर भंगारचे दुकान कसे काय ? प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

189

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २४ : स्थानिक गडचिरोली शहरातील गोकुळनगर येथील पाण्याच्या टाकीच्या मागे असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शासकीय जागेवर चक्क भंगारचे मोठे दुकान सुरू आहे. शहरातील सरकारी जागेवरच राजरोस हे भंगारचे दुकान सुरू असतानाही नगर परीषद प्रशासन किंवा कुठल्याही सरकारी विभागाला याबद्दल मागमूसही लागू नये, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

या भंगारच्या दुकानात प्रवेश करण्यासाठी शासकीय गोदामाचे फाटक आहे. या फाटकातूनच भंगारच्या दुकानात प्रवेश केला जातो. मात्र संबंधित विभाग व नगरपालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसून या अतिक्रमणाला साथ देण्याचे काम करत असल्याचा आरोप गोकुळनगर येथील नागरिक करत आहेत. भंगारचे दुकान म्हटले की, मोठ्या प्रमाणात लोखंड, प्लास्टिक, अॅल्युमिनियम, पितळ व तांबे खरेदी- विक्री करण्याचे दुकान असते. मोठ्या प्रमाणात स्थानिक स्तरावर बांधकाम सुरू असलेल्या व बांधकामात लागणाऱ्या लोखंडी सळाखी शासकीय कामात वापरण्यात येणाऱ्या खिडकी, दरवाजांच्या ब्रिगेट्स, राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारे बरेचसे साहित्य, अॅल्युमिनियम, तांब्याचे तार तसेच चोरीची वाहने, सायकल या भंगार दुकानात खरेदी होत असल्याचेदेखील आरोप नागरिकांनी केला आहे. वस्तुस्थिती बघण्यासाठी प्रत्यक्ष येथे गेल्यावर हे सारेच निदर्शनास आहे. मात्र हे भंगार दुकान कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याचा शोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे. हा भंगारवाला पत्रकारांना किंवा पोलिसांना जराही न घाबरता सांगतो की, आपण अधिकारी वर्गाला महिना देतो. त्यामुळे आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही. दररोज खरेदी केलेले हे सर्व साहित्य दररोज एक ते दोन ट्रक इतके असून नागपूर, चंद्रपूरसारख्या मोठ्या ठिकाणी विकले जात आहे. नेमके इतके भंगार गडचिरोलीत मिळते का, हा प्रश्न उपस्थित असून हे भंगार नसून चोरीचे साहित्य मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. पोलिस प्रशासनाने या भंगार दुकानाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच ज्या शासकीय जागेवर हे दुकान उभारण्यात आले तिथून हे दुकान तत्काळ हटवण्यात यावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. हळूहळू येथे असलेल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात लोक अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत. आता प्रशासनाने मोका चौकशी करून त्वरित हे अतिक्रमण हटवावे. ही जागाही शेतकऱ्यांच्या कृषी गोदामाची आहे. त्यामुळे ही जागा फार महत्त्वाची आहे. अशा ठिकाणी अतिक्रमण झाले तर शेतकऱ्यांचे खरेदी केलेले अन्नधान्य कुठे ठेवायचे, असा प्रश्न उद्भवणार आहे. आजपर्यंत चालत आलेले हे भंगारचे दुकान कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याबाबत देखील खऱ्या अर्थाने चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. यात यात दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची गरज आहे.

———————–