नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसची इतर पक्षातून आयात सुरू

340

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २७ : काँग्रेस हा देशातला सगळ्यात जुना व एकेकाळी दीर्घकाळ सत्ता गाजवलेला पक्ष असला, तरी या पक्षाची अवस्था गडचिरोली जिल्ह्यात केविलवाणी झाली आहे. आगामी नगर परीषद निवडणुकीत या पक्षाकडे प्रभावी व सक्षम उमेदवारच नसल्याने आपल्याच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षातून उमेदवाराची आयात करावी लागत आहे. आपल्या या नाईलाजाचाही उत्सव साजरा करत या पक्षाने प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मोठा मेळावा आयोजित करत हे उमेदवार आयातीचे सोपस्कार सोमवार २७ आॅक्टोबर २०२५ रोजी पूर्ण केले.

सोमवारी आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते व गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात त्यांच्या पत्नी माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार यांचाही समावेश असून त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काॅंग्रेसकडून देण्यात येणार असल्यानेच या मेळाव्याचे प्रयोजन होते, अशी चर्चा आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेसचे निरीक्षक संदेश सिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, पंकज गुड्डेवार, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास देणााऱ्या विषमतावादी विचारधारेचा वाहक भाजप पक्ष आहे. काँग्रेसने नेहमीच गोरगरिबांना अन्न, निवारा आणि सुरक्षा दिली. राज्यघटनेतील पाचव्या अनुसूचीद्वारे आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण केले. परंतु, आता याच जमिनी खाण व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट भाजपने घातला आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या भाषणात भाजप, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. यावेळी आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तसेच नव्याने पक्षात आलेले सुरेश पोरेड्डीवार व विजय गोरडवार यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले. या मेळाव्यात माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, माजी सभापती विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, लालसू नोगोटी, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, संध्या उईके, कविता बोबाटे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा खेवले, रामचंद्र वाढई यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने प्रभावी उमेदवार व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांअभावी आपल्याच मित्रपक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पक्षात भरती केल्याचे बोलले जात आहे.

—————————-