आत्मसमर्पित माओवादी भूपती म्हणाला, “शस्त्रे सोडा, मुख्य प्रवाहात यारे सारे”

217

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १ : जहाल माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शरणागती पत्करली होती. सध्या पोलिसांच्या सुरक्षेत असलेल्या भूपतीने अद्याप शरण न आलेल्या माओवाद्यांना हा लढायची वेळ नसून सरकारला शरण येऊन मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे भावनिक आवाहन केले आहे. पोलिसांच्या मदतीने तयार केलेल्या चित्रफितीच्या माध्यमातून त्याने ही आर्त साद घातली आहे.

माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर जहाल माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शरणागती पत्करली होती. या शरणागतीनंतर केंद्रीय समितीने भूपतीला ‘गद्दार’ संबोधत त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. अखेर, शनिवार (ता.१) जिल्हा पोलिसांच्या मदतीने एक चित्रफीत प्रसिद्ध करून भूपतीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘आता परिस्थिती बदलली आहे, शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात या,’ असे आवाहन त्याने या चित्रफितीद्वारे चळवळीतील सक्रिय माओवाद्यांना केले आहे. भूपतीने आपल्या ६० साथीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरण येण्याच्या महत्त्वपूर्ण घटनेनंतर छत्तीसगडमधील बस्तर येथे जहाल नेता रुपेशसह २१० माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यापाठोपाठ, केंद्रीय समितीचा सदस्य पुल्लरीप्रसाद ऊर्फ चंद्रन्ना आणि तेलंगण राज्य समितीचा सदस्य बंडी प्रकाश ऊर्फ प्रभात हे दोघे २८ ऑक्टोबर रोजी शरण आले. या सलग घटनांमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान. केंद्रीय समितीने भूपती आणि रुपेश यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत ‘गद्दार’ व ‘फितूर’ असे शब्द वापरत तीव्र टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, भूपतीने शनिवारी प्रथमच ५ मिनिटे १७ सेकंदांची चित्रफीत प्रसिद्ध केली. यात त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “१६ सप्टेंबर रोजी आपण प्रथम शस्त्रबंदीचा विचार मांडला आणि त्यानंतर ६० सहकाऱ्यांसह शरणागती पत्करली. हा निर्णय बदललेल्या परिस्थितीला अनुसरूनच घेण्यात आला आहे. बदलत्या परिस्थितीचे संकेत ओळखून, शस्त्रे सोडून कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी काम करण्याचा आम्ही निर्धार केला आहे,” असे भूपतीने म्हटले आहे. केंद्रीय समितीने वापरलेल्या ‘गद्दार’ या शब्दप्रयोगाबद्दल खंत व्यक्त करत त्याने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

“आम्ही घेतलेल्या निर्णयावर चळवळीतील सक्रिय माओवाद्यांनी शांतपणे विचार करावा,” असे आवाहन भूपतीने केले आहे. तसेच, सुज्ञ नागरिक आणि आदिवासी बांधवांनी आमच्या भूमिकेचे समर्थन करून आपले अभिप्राय द्यावेत, असे सांगत त्याने स्वतःचा आणि रुपेशचा मोबाइल क्रमांकही दिला आहे. दरम्यान छत्तीसगडमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये चकमकीत ठार झालेला जहाल नेता कट्टा रामचंद्र रेड्डी ऊर्फ राजू दादा याची पत्नी शांतीप्रिया हिने ३१ ऑक्टोबर रोजी शरणागत माओवाद्यांनीच आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला होता. यात तिने भूपती व रुपेश यांचा थेट नामोल्लेख करत टीका केली होती. या आरोपांवर भूपतीने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत कोणताही खुलासा केलेला नाही, मात्र आपण लवकरच आणखी एक चित्रफीत प्रसिद्ध करणार असल्याचे त्याने नमूद केले आहे. त्यामुळे या पुढील चित्रफितीत या आरोपाचे खंडन राहील की नवे काही भावनिक आवाहन असेल, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

———————-