जिल्ह्यात चक्क बनावट देशी दारूचा कारखाना ग्लोबल गडचिरोली न्यूज,

200

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : जिल्ह्यात अवैध दारूनिर्मिती व तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलिसांनी मद्यसाठा, वाहनासह एकाच्या घरात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमवार (ता. ३) स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमिदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व्यंकटेश बैरमवार, रा. मुरूमगाव ता. धानोरा जि. गडचिरोली हा आपल्या घरी बनावट देशी दारू तयार करून कारखाना चालवून तयार केलेली दारू आजुबाजुच्या परीसरात टाटा कंपनीचे सुपर ए.सी.ई. मींट चारचाकी वाहन क्र. एम. एच. ३४ ए. वी. २०५१ मधुन बनावट दारूची वाहतुक व पुरवठा करीत आहे. यावरून या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी मुरूमगाव बाजार मंडी येथे सापळा रचला. संशयित चारचाकी वाहन उभे असल्याचे दिसून आले. त्यानंतर पंचासमक्ष पाहणी केली वाहनाच्या मागील डाल्यात असलेल्या चोरकप्यामध्ये देशी- विदेशी दारूचा साठा आढळून आला. यासोबतच जवळच असलेल्या व्यंकटेश बैरवार याच्या मालकीचे अशोक लेलँड कंपनीचे (दोस्त) हे चारचाकी वाहन क्र. एम एच ३३ टी. २०३५ संशयास्पदरीत्या पोलिस पथकास दिसून आले. त्यानंतर या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यात बनावट दारू बनविण्याकरीता वापरण्यात येणारे रासायनिक द्रव्य (स्पिरीट) ने भरून असलेले दोन ड्रम आढळले. यानंतर वाहनापासून जवळच असलेल्या व्यंकटेश बैरवार याच्या घरी जाऊन पोलिस पथकाने शोध घेतला असता, त्याच्या घरात बनावट दारू बनविण्याकरिता वापरण्यात येणारे तसेच सिलींग करिता वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. या तिन्ही ठिकाणावरुन जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये सर्व मिळून एकूण १० लाख १६ हजार ३७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे. या अनुषंगाने आरोपी व्यंकटेश बैरवार याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरु असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन ठेंग करत आहेत.

—————————-