गडचिरोली, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत अत्यंत सकारात्मक व उत्सुक आहेत आणि लॉयड्स कंपनी या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पूर्वी जमशेदपूरची स्थिती इथल्यापेक्षाही खराब होती. पण जमदेशपूर वसल्यानंतर स्थिती पूर्ण बदलली. आता गडचिरोलीला जमशेदपूरपेक्षाही मोठी स्टिल सिटी बनवणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, असे प्रतिपादन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी केले.
गडचिरोलीला राष्ट्रीय आणि जागतिक कौशल्य विकास केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने गुरुवार (ता. ११) लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या उपक्रमाची सुरुवात केली. हा उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या हस्ते, तसेच अल्का मिश्रा (चेअरपर्सन – स्किल डेव्हलपमेंट), LICL चे एमडी व्यंकटेश संधिल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना गडचिरोलीतील युवकांच्या सक्षमीकरणासाठी आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक ठरत आहे. यावेळी आपले विचार व्यक्त करताना व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले की, LMGSE अंतर्गत दिले जाणारे वेल्डिंग, प्लंबिंग, ट्रान्सपोर्ट, इतर तांत्रिक कौशल्ये यामुळे येथील युवकांना रोजगारक्षम बनवण्यास मदत होईल. या मिशनचे उद्दिष्ट म्हणजे कौशल्यातील गंभीर अंतर भरून काढणे, उद्योगाच्या वास्तविक गरजांशी प्रशिक्षणाची जुळवणी करणे आणि विशेषतः वंचित समुदायांसाठी शाश्वत आजीविका निर्माण करणे. जागतिक रोजगार संधी व स्थानिक विकास यांना एकत्र करून, LMGSE गडचिरोलीच्या युवकांना नव्या आणि हरित उद्योगांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधींशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले. ९० दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ४५ दिवसांचे प्रशिक्षण आणि ४५ दिवसांची ऑन-जॉब ट्रेनिंग यांचा समावेश आहे. पहिल्या तुकडीत ३०० विद्यार्थी बार-बेंडिंग आणि शटरिंग या उच्च मागणी असलेल्या ट्रेड्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
ही तुकडी गडचिरोलीत व्यापक आणि शिस्तबद्ध कौशल्य चळवळ सुरू होण्याचे प्रतीक आहे. LMGSE ने पहिल्या वर्षात १०, ००० युवकांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. या प्रयत्नामुळे गडचिरोलीच्या दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचा पाया रचला जाईल, रोजगार संधी वाढतील आणि स्थानिक उद्योगांत सहभाग वाढेल. या मिशनची खास वैशिष्ट्ये म्हणजे कौशल्य विकासासोबतच टिकाऊपणा ज्यामुळे विशेषतः महिला आणि युवकांना आधुनिक, पर्यावरणपूरक क्षेत्रात स्थिर करिअर घडवण्याची संधी मिळेल. LMGSE अंतर्गत विविध तांत्रिक व व्यावसायिक trades मध्ये उद्योग-सुसंगत, संरचित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात बांधकाम व पायाभूत सुविधा (मेसनरी, बार-बेंडिंग, शटरिंग), मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल ट्रेड्स, अक्षय ऊर्जा, ऑटोमोबाईल सेवा, लॉजिस्टिक्स सपोर्ट, फ्रंटलाइन सेवा क्षेत्र, प्रत्येक कार्यक्रमात प्रत्यक्ष सराव, उद्योगमान्य प्रमाणपत्रे आणि रोजगाराशी थेट जोडणीवर भर दिला जाईल. प्रशिक्षार्थी नोकरीसाठी सक्षम कौशल्यांसह बाहेर पडतील आणि उद्योजकतेची संधीही प्राप्त करतील. LMGSE चा प्रमुख घटक असलेला लॉजिस्टिक्स अँड ड्रायव्हिंग सेंटर ऑफ एक्सलन्स भारतातील वेगाने वाढणाऱ्या लॉजिस्टिक्स उद्योगासाठी अत्याधुनिक, विशेष प्रशिक्षण देणार आहे. हेवी मोटर व्हेईकल (HMV) ड्रायव्हिंग, ४० फूट ट्रेलर ड्रायव्हिंग, महिलांसाठी तीन-चाकी वाहन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्दिष्ट चार हजारहून अधिक व्यावसायिक ड्रायव्हर्स तयार करण्याचे आहे. सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण, प्रमाणित मार्गदर्शन आणि उद्योग-आधारित प्लेसमेंट याद्वारे हे केंद्र वेगाने विकसित होत असलेल्या वाहतूक क्षेत्रात सर्वसमावेशक आणि टिकाऊ रोजगार उपलब्ध करून देईल, असेही कार्यक्रमात सांगण्यात आले.
—————————————————–










