ठाकूनगराच्या रोहित पालची सहायक वनसंरक्षक पदाला गवसणी

571

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १४ : माओवादग्रस्त, अतिमागास अशीच ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गुणवंतांची मात्र अजिबात कमतरता नाही. जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर या छोट्याशा खेड्यातील रोहित रवींद्र पाल याने हेच सिद्ध केले आहे. त्याने एमपीएससी वनसेवा परीक्षेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत सहायक वनसंरक्षक (वर्ग-१) पद पटकावले.

चामोर्शी तालुक्यातील ठाकुरनगर या छोट्याशा गावातील रोहित पाल यांचे वडील रवींद्र पाल यांनी या गावाच्या सरपंच पदाची जबाबदारीसुद्धा सांभाळली आहे. रोहित पाल यांनी ठाकूरनगर येथीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. सातवीनंतर सुभाषग्राम येथील इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये सेमी-इंग्रजी माध्यमात शिकले. तिथे शिक्षक जे. ए. सरकार, बी. एन. मंडल आणि अलोने यांच्या मार्गदर्शनात त्यांची शैक्षणिक प्रगती झाली. दहावीनंतर जे. ए. सरकार यांच्या सल्ल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि अव्वल स्थान मिळवले. अभियांत्रिकी पदवीनंतर सनदी अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) करिता दिल्ली गाठली. पण अंतिम टप्प्यात अल्प फरकाने संधी हुकली. मात्र निराश न होता राज्यसेवेकडे वळले. सामाजिक कल्याण अधीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी अशा परीक्षा क्रॅक करून नोकरी सुरू केली. मंत्रालयात रूजू होताच लग्न झाले आणि पत्नीच्या प्रोत्साहनाने पुण्यात वनसेवेची तयारी प्रारंभ केली. ऑनलाइन व्याख्याने, डिजिटल नोट्स व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. एमपीएससी वनसेवा ही राज्यातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांपैकी एक. ग्रामीण पार्श्वभूमीतून अभ्याससाधने व मार्गदर्शनाची कमतरता असतानाही रोहित पाल यांनी या परीक्षेचा गड सर केला.

————————————-