गडचिरोलीत भाजपचा झेंडा फडकला; प्रणोती निंबोरकर नगराध्यक्षपदी ऐतिहासिक विजय

96

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता.२१: गडचिरोली शहराच्या राजकारणात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत शहराच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आहे.शहरातील नागरिकांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड विश्वास दाखवत प्रणोती निंबोरकर यांच्या पारड्यात स्पष्ट कौल दिला. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून, तो नव्या नेतृत्वाचा, नव्या विचारांचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय मानला जात आहे.स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकासाचा ठोस आराखडा मांडत, प्रणोती निंबोरकर यांनी निवडणूक काळात जनतेशी थेट संवाद साधला.याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे मेहनत घेतली.घराघरांत पोहोचलेला प्रचार, विकासाचा स्पष्ट रोडमॅप आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय साकार झाला.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी शहरातील नागरिकांचे आभार मानले आणि म्हणाल्या —

“गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी, शहरातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार मी केला आहे.”

या निकालामुळे गडचिरोली शहरात भाजपची राजकीय ताकद अधिक मजबूत झाली असून,

आता नागरिकांना विकासाचा नवा संकल्प प्रत्यक्षात उतरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.