राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या कमलापुरच्या आश्रमशाळेत ५१४ रुग्णांवर मोफत औषधोपचार

154

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अहेरी, ता. २० : तालुक्यातील कमलापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित रोगनिदान शिबिरात ५१४ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून थोर समाजसेवी व्यक्तिमत्व आणि राष्ट्रसंताचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात रोगनिदान शिबिराचे करण्यात येत असते. शिबिर धन्वंतरी हास्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी सेंटर गडचिरोली आणि माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. यात एकूण ५१४ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच औषधोपचार करण्यात आले. उद्‌घाटन प्रसंगी दलित मित्र नानाजी वाढई, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी अरविंद पाटील वासेकर, डॉ. अंनता कुंभारे, प्रचार प्रमुख पंडित पुडके, कमलापूरच्या सरपंच रंजिता मडावी, राणी कुंभारे तसेच जिल्ह्यातील बहुतेक श्री गुरुदेव सेवक प्रचारक उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, एक्सरे, अस्थिरोग,बालरोग, अस्थमा, दंतरोग, स्त्री रोग आदी सर्व प्रकारच्या रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि सर्व रुग्णांची रक्तदाब व रक्त तपासणी करण्यात आली. गडचिरोली येथील धन्वंतरी हास्पिटलचे संचालक तथा क्ष किरण तज्ज्ञ डॉ. अनंता कुंभारे, शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. यशवंत दुर्गे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन कुमरे, ह्दय रोग तज्ज्ञ डॉ. राकेश चहांदे, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चलाख, डाॅ. निखिल चव्हाण, डॉ. मुकेश आतालगडे, डेंटल सर्जन डॉ. प्रफुल्ल वाळके, डॉ. उमेश समर्थ, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ . खुशबू दुर्गे, डॉ. मयूर दुधबळे, क्षयरोग तज्ज्ञ डॉ. सचिन हेमके, डॉ ‌. किशोर वैद्य, डॉ. रूपाली पाटील, हरिश दांडेकर, सचिन येनप्रेडीवार, अमित संगीडवार, मनीष गुड्डेवार आदींनी आरोग्य सेवा दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल परिसरातील आदिवासी समाज बांधवांनी श्री गुरुदेव व्यायाम व शिक्षण सेवा प्रसारक मंडळाचे कौतुक करून धन्यवाद दिले. मंडळाच्या वतीने शिबिराच्या निमित्ताने आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वाटर बाॅटल आणि मच्छरदाणी भेट स्वरूपात देण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अमित साळवे यांनी सहकार्य केले. संचालन ए. एन. कोहाडे, प्रास्ताविक श्री गुरुदेव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर. सी. मज्जी यांनी केले. यावेळी बी.पी. चौधरी, सुरा, सांबयाजी रालाबंडीवार, सोमय्या कोंडागुर्ले, किसन भट, बकय्या चौधरी, पुरुषोत्तम येजुलवार, शशिकला कोडाप, सावित्रीबाई चिप्पावार, पत्रकार श्रीधर दुग्गीरालापाटी, गणेश कोडापे, रेपलवार सावकार, जनगम, आश्रमशाळेचे तथा गुरुदेव विद्यालयाचे शिक्षक-वृंद विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील गोकुळनगर शाखा, रामनगर शाखा, वाकडी, डोंगरगाव, एटापल्ली शाखेतील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना करून या महाआरोग्य शिबिराची सांगता करण्यात आली. शिबिरानिमित्त आलेल्या जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर मंडळीनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९५८ मध्ये स्थापन केलेल्या सामुदायिक प्रार्थना मंदिराचे व श्री गुरुदेव कुटीचे दर्शन घेत आपले जीवन कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली.