आई-वडील मजुरीसाठी तेलंगणात आणि घरात फासावर लटकलेला आढळला चिमुकल्याचा मृतदेह

156

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३ : गरीब आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी दूर अंतरावर तेलंगणा राज्यात गेले आणि इकडे गावात त्यांच्या निरागस चिमुकल्याचा मृतदेह घराच्याच फाट्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा घरीच गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह रविवार (ता. १) सायंकाळी ४.३० वाजताच्या आढळून आला. संस्कार विनोद कन्नाके (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील संस्कार विनोद कन्नाके रविवारी शाळेला सुट्टी असल्याने दिवसभर गावातच खेळत होता. त्याचे आई-वडील मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेले होते. रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या घराच्या फाट्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांना धक्काच बसला. या घटनेची माहिती लगेच गावातील पोलिस पाटील माधुरी सहारे यांना देण्यात आली. पोलिस पाटील सहारे यांनी भ्रमणध्वनीद्वारे आरमोरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उतरणीय तपासणीकरिता आरमोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवला. घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलिस करत आहेत. या दहा वर्षीय निरागस बालकाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. संस्कारचे आई-वडील मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेल्याने तो परात एकटाच होता. शाळेतून घरी परतल्यानंतर नेगके काय घडले, त्याने खरेच आत्महत्या की हा घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. उत्तरीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

—————————————