तीन माओवादी ठार झाले, पण पोलिस जवान विरतेने लढताना शहीद

97

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : जिल्ह्याच्या भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगल परिसरात माओवादविरोधी मोहीम राबवत असताना पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत पोलिसांनी आतापर्यंत तीन माओवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या कारवाईदरम्यान माओवाद्यांशी लढताना पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (रा. अहेरी, मूळ मांड्रा) शहीद झाले, तर अन्य एक जवान जखमी झाला आहे.

मंगळवार (ता. ३)संध्याकाळी माओवाद्यांच्या ‘कंपनी क्रमांक १०’ आणि छत्तीसगडमधील एका दलमची हालचाल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी माओवादीविरोधी मोहीम राबवण्यास सुरूवात केली. सी-६० च्या १४ पथकांनी रात्रीच जंगलात कूच केली होती. गुरुवार (ता. ५) दिवसभर चाललेल्या या चकमकीत पोलिसांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले होते. गुरुवारी अतिरिक्त पथके आणि सीआरपीएफच्या तुकडीला पाचारण केल्यानंतर या मोहिमेत शुक्रवार (ता. ६) सकाळी आणखी दोन माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये एका पुरुष आणि एका महिला माओवाद्याचा समावेश आहे. आतापर्यंत या चकमकीत एकूण ३ माओवादी (२ पुरुष व १ महिला) ठार झाले असून, त्यांच्याकडून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. अद्याप मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ओळख पटलेली नाही.माओवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सी-६० पथकाचे ३८ वर्षीय जवान दीपक चिन्ना मडावी (रा. अहेरी, मूळ मांड्रा) हे गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी पहाटे त्यांना अबुझमाडच्या घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. याच मोहिमेदरम्यान जोगा मडावी हे जवानही गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. त्यांनाही हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना गडचिरोली येथे हलवण्यात येणार आहे. या भागात अद्यापही माओवाद्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम सुरूच आहे. दुर्गम भाग आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत जवान ही मोहीम राबवत असून, सविस्तर तपशील शोधमोहीम पूर्ण झाल्यावरच देण्यात येईल, असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले आहे. अबुजमाड जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना शुक्रवार गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास अंतिम सलामी देण्यात आली. पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान दीपक मडावी यांच्या पार्थिवाला मानवंदना देताना वातावरण शोकाकूल झाले होते. शहीद दीपक मडावी यांच्या १० वर्षीय मुलाने नातेवाइकाच्या कडेवर बसून आपल्या वडिलांच्या पार्थिवाला सॅल्यूट केला, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. शहीद मडावी यांची वृद्ध आई श्रद्धांजली वाहताना बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार केले.हुतात्मा दीपक मडावी यांचे पार्थिव अहेरी तालुक्यातील दामरंचा या मूळ गावी रवाना करण्यात आले.

—————————————————