नागरिकांचा जीव महत्त्वाचा; वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी रिंग रोडला मंजुरीची सहपालकमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल यांच्याकडे ठोस मागणी .

90

नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांची , गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा .

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ७ :  शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि सातत्याने घडणारे अपघात यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून गडचिरोली शहरासाठी प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी ठाम व आग्रही मागणी नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल यांच्याशी नगर परिषद गडचिरोली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस पालकमंत्री तथा सहपालकमंत्री मा. ना. अॅड. आशिषजी जयस्वाल प्रमुख उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी अत्यंत ठाम आणि भावनिक शब्दांत भूमिका मांडत सांगितले की,

“माझ्या पदापेक्षा गडचिरोली शहर व जिल्ह्यातील नागरिकांचा जीव माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि अपघातांमुळे जर नागरिकांचे प्राण धोक्यात येत असतील, तर ते थांबवणे ही माझी नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी आहे.”

नगराध्यक्षा निंबोरकर यांनी पुढे स्पष्ट केले की, गेल्या काही वर्षांत गडचिरोली शहराची लोकसंख्या तसेच वाहनसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र शहरातील मुख्य रस्ते अत्यंत अरुंद असल्याने अवजड वाहतूक शहरातूनच प्रवास करत आहे. अपुरे वाहतूक नियोजन आणि मर्यादित पायाभूत सुविधा यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता रिंग रोड हा अत्यावश्यक व तातडीचा प्रकल्प असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अपघातांवर नियंत्रण येईल आणि गडचिरोली शहराचा नियोजित, सुरक्षित व संतुलित विकास साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यामुळे या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देऊन कामाला सुरुवात करावी, तसेच प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही नगराध्यक्षा निंबोरकर यांनी स्पष्ट केले.

या बैठकीदरम्यान रिंग रोड प्रकल्पासोबतच गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, नागरी सुविधा, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील विकास योजनांवर सविस्तर मंथन करण्यात आले.

या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर, नगर परिषदेचे पदाधिकारी, सभापती, नगरसेवक तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, ठाम भूमिकेमुळे आणि नागरिककेंद्री निर्णयक्षमतेमुळे गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असून, रिंग रोड प्रकल्पाला लवकरच गती मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.