ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने शहरातील गुजरी व गुजरी परिसराची नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान गुजरी परिसरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिग, अस्वच्छता, दुर्गंधी तसेच नाल्यांमध्ये साचलेला कचरा आढळून आला. ही परिस्थिती गांभीर्याने घेत नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी तात्काळ संबंधित विभागाला सूचना देत सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा उचल, परिसराची स्वच्छता तसेच नाल्यांची सखोल सफाई युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले. पाहणीदरम्यानच स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली.
या पाहणीवेळी नगराध्यक्षांसोबत आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे, उपशिक्षण सभापती शिल्पा नेमके, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेवक शेखर आखाडे उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे परिसरातील स्वच्छतेशी संबंधित समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर त्वरित उपाययोजना केल्या.
नगराध्यक्षांनी यावेळी भाजीपाला विक्रेते तसेच स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, स्वच्छतेबाबतच्या समस्या व नाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, नाल्यांमध्ये कचरा न टाकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या,
“शहराची स्वच्छता ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून त्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्वच्छ गडचिरोली हेच आपले ध्येय असून, स्वच्छ नाले व स्वच्छ परिसरासाठी सातत्याने कठोर कारवाई केली जाईल.”
या त्वरित स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही अशाच नियमित पाहण्या व स्वच्छता मोहिमा राबविण्याचे संकेत नगर परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत










