ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, दि. ११ : देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर व संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांमुळे देशातील कामगार वर्गासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नव्या कायद्यांमुळे रोजगाराच्या संधी कमी होत असून कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच केंद्र सरकारची आर्थिक धोरणे कामगार व शेतकरीविरोधी असल्याची टीका करण्यात आली आहे.
विविध शेतकरी संघटनांनीही भारत बंदची हाक दिली असून कामगार–शेतकरी एकजुटीचे हे आंदोलन अधिक व्यापक व प्रभावी होणार असल्याचे चित्र असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.
मा. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी १२ फेब्रुवारी रोजीच्या भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संपूर्ण पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
कामगार व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.










