रुग्णसेवेचा महायज्ञ: गडचिरोलीच्या जनतेसाठी ‘आमदार वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ समर्पित!

115

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २३ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तमाम माता-भगिनी, युवक मित्र आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची चिंता दूर करण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण आणि जनहितकारी पाऊल उचलण्यात आले. सामान्य नागरिकांना आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मार्गदर्शन मिळावे, योग्य उपचारांची दिशा मिळावी तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ सहजपणे मिळावा या उद्देशाने ‘आमदार वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ आणि त्याच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकाचे (८८ ०८ ०४ ०८ ०४) भव्य लोकार्पण करण्यात आले.

हा कक्ष केवळ एक कार्यालय नसून गडचिरोलीच्या जनतेसाठी एक सक्षम ‘आरोग्य कवच’ ठरणार आहे. या माध्यमातून रुग्णांना विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, उपचारांसाठी शिफारस पत्रे, तसेच तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी समन्वय साधला जाणार आहे.

विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अनेक वेळा माहितीअभावी रुग्णांना योजनांचा लाभ मिळत नाही. ही दरी कमी करण्यासाठी हा सहाय्यता कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

यापुढे कोणत्याही आरोग्यविषयक अडचणींसाठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक ८८ ०८ ०४ ०८ ०४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोलीच्या सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच रुग्णसेवेचा एक महायज्ञ ठरणार असून, आरोग्य क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणार आहे.