गावात घुसून बिबट्याचा तरुणावर हल्ला

111

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

कुरखेडा, ता. २५ : तालुक्यीतील धमदीटोला या गावात घुसून बिबट्याने एका तरुणावर हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवार (ता. २४) रात्री घडली. घरामागे लघूशंकेकरिता गेलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. हल्ला होताच तो किंचाळल्याने कुटूंबीय व शेजारी मदतीला धावले. त्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली व तरुणाचे प्राण वाचले.

सदानंद धरमदास उईके (वय ३२), असे बिबट्याच्या हल्ल्यात जखणी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे मागील पाच-सहा दिवसांपासून या परीसरात बिबट्याचा धूमाकूळ सूरू आहे. यापूर्वी मका पिकात दडून असलेल्या बिबट्याला पिटाळून लावतानासुद्धा बिबट्याच्या प्रतिहल्ल्यात दोन युवक जखमी झाले होते. आता याच बिबट्याने थेट गावात प्रवेश करून घरामागे लघुशंकेसाठी गेलेल्या सदानंद उईके यांच्यावर हल्ला केला. तसेच अन्य एका शेतकऱ्याच्या गायीच्या वासरालासुद्धा या बिबट्याने ठार केले आहे. गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या चमूने बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सदानंद उईकेला रात्रीच येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी जखमी झालेल्या युवकावरसुद्धा येथेच उपचार सुरू आहेत. बिबट्याचा धुमाकूळाने ग्रामस्थ प्रचंड दहशतीत आहेत. रात्री, पहाटे त्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बुधवार (ता. २५) सकाळी उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, माजी पंचायत समिती सदस्य धरमदास उईके यांनी भेट देत रुग्णाची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कवाडकर यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस व उपचाराची माहीती घेतली. तसेच येथूनच वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत हल्लेखोर बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व तिन्ही जखमींना तसेच बिबट हल्ल्यात वासरू ठार झालेल्या शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत प्रदान करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

—————————–