‘देवभाऊ’ चामोर्शीतील लाडक्या बहिणींचे मरण बघायचे आहे का? अन्यायग्रस्त महिलांच्या आंदोलनाकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष

358

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली, ता.२७ : भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक आशिष पिपरे, नगरसेविका सोनाली पिपरे यांनी चामोर्शी येथील अनेक गरीब शेतकरी, शेतमजुर महिला व पुरूषांची अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक फसवणूक करून आता राजकीय दबाव तंत्राचा व बड्याबड्या नेत्यांच्या नावाचा, फोटोचा वापर करून अधिकाऱ्यावर दबाव टाकून ही प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत न्याय देण्याच्या मागणीसाठी अन्यायग्रस्त महिला जिल्हाधिकारी कार्यालायपुढे आमरण उपोषणाला बसल्या आहेत. त्यातील चार महिलांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आम्ही मरू पण न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशा निर्धाराने झुंजत असलेल्या या महिलांचे मृत्यू राज्याचे मुख्यमंत्री तथा तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे ‘देवभाऊ’ बघणार आहेत काय, असा संतप्त सवाल या महिला विचारत आहेत.

आर्थिक फसवणूक करणाऱ्या आशिष अरूण पिपरे आणि सोनाली आशिष पिपरेची एसआयटी चौकशीची मागणी आंदोलनकर्त्या महिला, पुरुषांनी केली आहे. सन २०२० पूर्वी आशिष पिपरे यांच्या घरावर बँकेच्या कर्जाची जप्ती आलेली असताना गेल्या ५ वर्षामध्ये अनेक गरीब शेतकरी, शेतमजुर महिला व पुरूषांना अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक करून, आमिष दाखवून, अनेक बड्या नेत्यांचा व फोनकॉलचा वापर करून अधिकाऱ्यावर दबाव टाकून गरीब महिला व शेतकऱ्यांची लुट करून अमाप संपत्ती गोळा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणातील अन्यायग्रस्तांनी १ एप्रिल २०२५ ला झालेल्या अन्यायाबाबत लेखी निवेदनाद्वारे तसेच पत्रकार परिषदेद्वारे कळवून न्याय मागीतला. परंतु शासन व प्रशासनाने अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. मार्च २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील जनता दरबारात या प्रकरणातील महिला व पुरूषांनी निवेदन देऊन न्याय मागीतला. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्याकडून पोलिस अधीक्षक, गडचिरोली यांना २४ एप्रिल २०२५ व ३ डिसेंबर २०२५ ला पत्र देऊन ट्रॅक्टर खरेदी विक्री प्रकरणात कार्यवाही करण्याचे कळविले. परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ६ आॅगस्ट २०२१ ला आर. एन. ट्रेडींग कंपनीला व ५ आॅगस्ट २०२२ ला पत्र देऊन अगरबत्ती प्रकरणामध्ये कार्यवाही करण्यास कळविले. परंतु आर. एन. ट्रेडींग कंपनी खोटी असल्यामुळे तसेच महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्यावर दबाव असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. चिचडोह बॅरेज जमीन भूसंपादन रजिस्ट्री प्रकरणामध्ये गरीब शेतकऱ्याला जास्तीचे पैसे मिळवून देतो, त्यासाठी अधिकाऱ्यांना व नेत्यांना पैसे द्यावे लागतात म्हणून शेतकऱ्याच्या साधेपणाचा फायदा घेऊन कोऱ्या चेकवर सह्या घेऊन चार लाख रूपयाची लुट केली. या प्रकरणातील अन्यायग्रस्त महिला शालीनी नंदकिशोर पिपरे यांनी तक्रार दिली असता त्यांची तक्रारही नाकारण्यात आली. याबाबत अनेक निवेदने दिले. पण कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.या तिन्ही प्रकरणांतील महिला व पुरूषांनी न्याय न मिळाल्यास आम्ही २३ फेब्रुवारी २०२६ ला आमरण उपोषण करू असे कळविले. परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आज उपोषणाला पाच दिवस झाले असून शासनाला व प्रशासनाला जाग आलेली नाही. उपोषणाला बसलेल्या महिलांची प्रकृती बिघडल्याने चार महिलांना दवाखान्यात भरती केले आहे. आणखी बऱ्याच महिलांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यामुळे एखाद्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्याला आशिष पिपरेसह शासन, प्रशासन व खुद्द मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असे अन्यायग्रस्त आंदोलकांनी म्हटले आहे. कार्यवाही न केल्यास आम्ही आत्मदहनही करू, असा इशाराही दिला आहे. उपोषणात सहभागी झालेल्या महिलांमध्ये मीनाक्षी देवराव पिपरे,देवांगना महेश गौतम, निवृत्ता प्रकाश गव्हारे, शीला पुरुषोत्तम धोडरे, कविता रवि कारडे, सुषमा सतीश धोडरे, रेखा सुनिल गव्हारे, छाया उमाजी बोदलकर, वेणू विनोद धोडरे, अनिता गुणवंत पिपरे, मनिषा योगेश्वर गव्हारे, सुषमा राजेश बुरांडे, अर्चना किशोर बुरांडे, शारदा बबन पिपरे, साधना बाळा धोडरे, जयश्री रमेश पिपरे, वंदना सविंद्र कोठारे, अर्चना सुनिल धोडरे, अश्विनी धनराज गव्हारे यांच्यासह इतर महिला व पुरुषांचा समावेश आहे.

आशिष पिपरेही म्हणतात, चौकशी करा…

दरम्यान आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेले आशिष पिपरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत माजी आमदार डाॅ. देवराव होळी यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केलेला मेक इन गडचिरोली प्रकल्प, त्याअंतर्गत असलेला अगरबत्ती प्रकल्प आदींची चौकशी करण्याची मागणी एका पत्रकार परीषदेत केली आहे. आपल्याविरूद्ध राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचेही म्हटले आहे.

—————————————-