ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. २७ : गडचिरोली शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते विविध प्रभागांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
गडचिरोली नगरपरिषद यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर तसेच संबंधित प्रभागांतील नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपूजन करून विविध विकासकामांना अधिकृत सुरुवात करण्यात आली.
शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्ते बांधकाम, नाली बांधकाम तसेच इतर मूलभूत सुविधांची उभारणी हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, खराब रस्त्यांमुळे होणारी गैरसोय आणि स्वच्छतेच्या समस्या दूर करण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत. या उपक्रमांमुळे नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार असून दैनंदिन जीवन अधिक सुसूत्र होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनावेळी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. अनेकांनी नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे आणि नियोजनबद्ध कामकाजाचे कौतुक करत विकासाच्या निर्णयाचे स्वागत केले.
नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात करून ॲड. निंबोरकर यांनी विकासाला वेग दिला आहे. केवळ आश्वासनांवर न थांबता कृतीतून शहराच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचा त्यांचा निर्धार या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे.
“माझे शहर – स्वच्छ, सुंदर आणि विकसित शहर” या संकल्पनेला मूर्त रूप देत गडचिरोली शहर विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आगामी काळातही विविध विकासकामांद्वारे पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचा मानस नगरपरिषदेने व्यक्त केला आहे.
गडचिरोलीकरांच्या अपेक्षांना न्याय देत शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाची ही घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










