गडचिरोली येथे तुमरकोठी पोस्टवर मोफत आरोग्य शिबिर पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

77

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता .२८ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोस्टे तुमरकोठी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पोस्टे तुमरकोठीची स्थापना करण्यात आल्यानंतर या भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या आरोग्य शिबिरात तुमरकोठी, मरुमभुशी, तोयणार, मरकणार व परिसरातील सुमारे २०० हून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांची तज्ञ वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.

या शिबिरात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ), डॉ. स्मिता साळवे (नाक, कान, घसा तज्ञ), डॉ. शुभम गट्टाणी (नेत्ररोग तज्ञ) तसेच पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी यांच्या नेतृत्वाखाली तपासणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच विविध आजार व पोषण समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

एकूण २१ नागरिकांना पुढील उपचारांसाठी विविध रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. बालरोग तज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तर स्त्रीरोग तज्ञांकडून विद्यार्थीनी व महिलांची तपासणी करून आवश्यक सल्ला देण्यात आला.

गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून आतापर्यंत १८१ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ४०,७५९ नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून ५ रक्तदान शिबिरांद्वारे ४,३६१ युनिट रक्त संकलित केले आहे. तसेच ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून १,४१२ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

नवनिर्मित पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि श्री. गोरखनाथ सुरासे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि श्री. शाहू दंडे, श्री. आशिष मेश्राम, रापोउपनि श्री. सुरेश वेलकर व अंमलदार यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.