सुरक्षित व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांचे आवाहन

69

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २ : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी गडचिरोलीकरांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सण साजरा करताना सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, होळी पेटवताना रबर, प्लास्टिक किंवा पर्यावरणास हानीकारक वस्तू जाळू नयेत. पारंपरिक पद्धतीने आणि मर्यादित स्वरूपात होळी साजरी करून पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. धुलिवंदन साजरे करताना रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक व त्वचेस अपायकारक नसलेले रंग वापरावेत. पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या आवाजातील डीजे किंवा ध्वनिवर्धकांचा वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. होळीच्या दिवशी नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत. होळी पेटवताना सुरक्षित अंतर राखणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे, ज्वलनशील पदार्थ जवळ न ठेवणे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. सणाच्या आनंदात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नागरिकांनी परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वच्छ, हरित आणि सुरक्षित गडचिरोली घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी केले आहे.

——————————–