ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. ७ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाले असून या शतकपूर्तीनिमित्त गडचिरोली शहरातील गोकुलनगर वस्तीच्या वतीने चामोर्शी मार्गावरील शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलजवळील मैदानात शनिवार ७ मार्च २०२६ विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून ब्रह्मपुरी येथील हरीभक्त परायण सविता खरवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भगवद्गीतेतील “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…” या श्लोकाचा उल्लेख करत सांगितले की, भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येते तेव्हा तेव्हा धर्मरक्षणासाठी विविध रूपांत कार्य होत असते. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात संघटन, संस्कार आणि धर्मरक्षणाचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर विभाग कार्यवाह सुभाषजी ईटनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, देश आणि धर्म टिकवून ठेवण्यासाठी हिंदू समाजातील वर्णभेद व भेदभाव दूर करणे आवश्यक आहे. समाजात सामाजिक समरसता निर्माण करणे ही काळाची गरज असून परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या लहान मुलांच्या बदलत्या मानसिकतेकडे पाहता कुटुंब प्रबोधनाची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करावा आणि विकासाच्या प्रत्येक कामात पर्यावरण संरक्षणाकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष अतिथी म्हणून उपस्थित नानाजी वाढई यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले . या संमेलनाची सुरुवात दुपारी ३.३० वाजता भव्य शोभायात्रेने झाली. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता धर्मध्वजारोहण व गोमाता पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. रात्री ८ वाजता भारतमातेची आरती करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी डोंगरे यांनी केले, तर प्रास्ताविक मोहित बुरम आणि आभार प्रदर्शन विजयजी साळवे यांनी केले. या कार्यक्रमात गडचिरोलीचे संघचालक घिसूलाल काबरा, संघाचे स्वयंसेवक, विविध आयामांचे प्रमुख व कार्यकर्ते, शहरातील मान्यवर व्यक्ती तसेच हिंदू समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, गोकुलनगर वस्तीच्या वतीने करण्यात आले होते. साईनगर, संताजी नगर, वीर बाबूराव शेडमाकेनगर, आशीर्वाद नगर, श्री गणेश मंदिर कॉलनी, कृष्णनगर, कन्नमवारनगर, तिरुपती कॉम्प्लेक्स, फुटका देऊळ परिसर व गंगानगर येथील नागरिकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
————————-










