गडचिरोलीतून यूपीएससीत यशाची झेप; रजत वाळके देशात ५१४ व्या क्रमांकावर नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्याकडून सत्कार

47

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली , ता . ८ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत रजत वाळके यांनी देशात ५१४ वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नक्षलग्रस्त आणि अति दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातून मिळवलेले हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले असून त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध तयारी आणि दृढ निश्चय यांच्या बळावर रजत वाळके यांनी हे यश मिळवले. मर्यादित साधनसामग्री, ग्रामीण वातावरण आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी गाठलेले हे यश गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी रजत वाळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक सागर अरुणजी निंबोरकर तसेच नगरपरिषद उपाध्यक्ष निखिल चरडे उपस्थित होते. मान्यवरांनी रजत वाळके यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, “गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम जिल्ह्यातून यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. रजत वाळके यांचे यश जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

रजत वाळके यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण मेहनतीला दिले. “प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा अवघड राहत नाही,” असे त्यांनी सांगितले.

रजत वाळके यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच गडचिरोली शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून पुढे येत त्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.