गडचिरोलीत अपघात टाळण्यासाठी स्वतंत्र मालवाहतूक रस्त्यांची मागणी; मुख्यमंत्री Devendra Fadnavis व केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना निवेदन

213

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली, ता. १३ : गडचिरोली जिल्ह्यात वेगाने होत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे जड मालवाहतूक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यातून अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विद्यमान रस्ते सामान्य वाहतुकीसाठी कायम ठेवून त्यालगत कारखानदारीतील माल व खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.

या संदर्भात संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत असून खाणकाम व उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर खनिज आणि इतर मालाची वाहतूक सुरू आहे. परिणामी, मोठ्या ट्रक व जड मालवाहतूक वाहनांची रहदारी दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्ते हे जुन्या आराखड्यानुसार तयार झालेले असून ते मुख्यतः सामान्य वाहतुकीसाठी वापरले जातात. मात्र त्याच रस्त्यांवरून जड ट्रक आणि मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी दुचाकीस्वार, चारचाकी वाहने आणि पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून विद्यमान रस्ते सामान्य वाहतुकीसाठी कायम ठेवून त्याला लागूनच किमान दीड फूट उंचीचे स्वतंत्र रस्ते तयार करण्यात यावेत, जे फक्त कारखानदारीतील माल व खनिज वाहतुकीसाठी वापरले जातील. त्यामुळे जड वाहतूक आणि सामान्य वाहतूक वेगळी होऊन अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

याशिवाय, ज्या भागांत गावांची वस्ती रस्त्यालगत आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी यांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल तसेच वाहतुकीची कोंडीही कमी होईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास होणे ही आनंदाची बाब असली तरी त्याचवेळी नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही शासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वतंत्र मालवाहतूक रस्ते तयार झाल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि सामान्य वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळेल.”

दरम्यान, हे निवेदन राज्याचे सहपालकमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल, राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय खान मंत्री, राज्यपाल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनाही पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले असून तेथून हा अर्ज संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे उत्तर प्राप्त झाल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणासोबतच जड वाहतुकीचे प्रमाणही वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून स्वतंत्र मालवाहतूक रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे….