ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, प्रतिनिधी :
गडचिरोली, ता : सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन, मालेगाव (जि. नाशिक) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार २०२६’ यंदा गडचिरोली येथील युवा पत्रकार सुरज गुंडमवार यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांच्या हस्ते, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजहितासाठी अविरत कार्य, वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय साधणे तसेच निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेद्वारे लोकहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडणे या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मालेगाव येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत भव्य व दिमाखदार वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, महिला प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रतापराव दिघावकर (माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य), डॉ. अमोल शेजवळ (लासलगाव), प्रा. सी. डी. रोटे (निफाड), संजय देशमुख (संस्थापक अध्यक्ष, साईधनवर्षा फाऊंडेशन, नाशिक) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पवार आणि सचिव आशाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली संस्था सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय उपक्रम राबवत असून राज्यभरात कार्याचा विस्तार करत आहे. समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा संस्थेमार्फत सातत्याने जपली जात आहे.
नक्षलग्रस्त व मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये अनेक वर्षांपासून पत्रकारिता व माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत राहून सुरज गुंडमवार यांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गरिब-गरजूंना हक्क मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि जनजागृती करणे या त्यांच्या कार्यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या ते युवा मराठा न्यूज चे ब्युरो चीफ असून, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र समिती, महाराष्ट्र राज्यचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्यचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल गडचिरोली जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










