गडचिरोली शहराच्या मैदानात आढळला तरुणाचा मृतदेह

162

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयासमोरील मारलीवार यांच्या खुल्या मैदानात एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार (ता. ३) सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हरबचनसिंग खन्ना सिंग पटवा (वय २४, रा. गोकुळ नगर, गडचिरोली) असे मृताचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी येऊन सखोल तपास सुरू केला. घटनास्थळी कोणतेही हत्यार किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, मृताचे दुचाकी वाहन चावी लावलेल्या अवस्थेत उभे आढळल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. हे मैदान हे शहरातील वर्दळीच्या वस्तीच्या जवळ असल्याने या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी व्यायाम व खेळण्यासाठी आलेल्या काही मुलांना सर्वप्रथम मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती कुटुंबीयांना व पोलिसांना दिली. सध्या गडचिरोली पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृताच्या नाक, तोंड तसेच गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकारअसल्याची शक्यता मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मृतताच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या करून मृतदेह मैदानात फेकल्याचा संशय व्यक्त केला आहे.

————————————–