सु्गंधित तंबाखू तस्करांसोबत हे काय झाले ?

108

स्थानिक गुन्हा शाखेने केली मोठी कामगिरी.

ग्लोबल गडचिरोली न्यूज.

गडचिरोली, ता. २ :

महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतानासुद्धा गडचिरोली जिल्ह्यात शेजारच्या छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतुक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हा शाखेने गुरुवार २ एप्रिल रोजा मोठी कारवाई केली. चार आरोपींना अटक करत पोलिसांनी १८ लाख २७ हजार रुपयांची प्रतिबंधित तंबाखू जप्त केला.

ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातून कुरखेडा – वैरागडमार्गे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करून आरमोरी हद्दीतील चिल्लर तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याबाबातची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात योग्य ते नियोजन करून पोलिस पथक वैरागड टी-पाइंटकरिता रवाना करण्यात आले. वैरागड टी-पाइंट चौकात पोलिस पथकातील अंमलदारांनी सापळा रचून खबरेतील दोन संशयित चारचाकी वाहन येत असताना दिसले. वाहनांना तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन थांबवून तपासणी केली असता दोन्ही वाहनांत एकूण १८ लाख २७ हजार रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू आढळला. तसेच गंगाधर भास्कर चिचघरे ( वय ३९), महेश सुधाकर भुरसे ( वय ३४), सोमेश्वर भास्कर चिचघरे ( वय ३६), अमोल अनिल भुरसे (वय २९) सर्व रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, जि. गडचिरोली यांना अटक करून अन्न व प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार नरेश सहारे, पोलिस हवालदार अकबरशहा पोयाम, पोलिस अंमलदार प्रशांत गरफडे, पोलिस अंमलदार श्रीकृष्ण परचाके, पोलिस अंमलदार श्रीकांत बोइना, चालक पोलिस अंमलदार दीपक लोनारे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

.