जादुटोण्याने खुन करण्याची धमकी देऊन तो करत होता अत्याचार.

128
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. ९ : नात्यातील अल्पवयीन मुलीवर विविध बहाण्याने वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला जादूटोणा करून तुझे आई, भाऊ, तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या नराधमाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी २५ वर्षांचा सश्रम कारावास व १ लाख रुपयांचा दंड सुनावला. शंकर सुधाकर टिंगुसले (वय ३४) रा. विवेकानंदनगर, गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे.
  • अवघ्या १५ वर्षांच्या मुलीवर झालेल्या या अत्याचाराची करुण कहानी ऐकताना कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. त्या अजाण मुलीच्या निरागसतेचा, भितीचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध स्थापन करत तिला गर्भवती केले. समाजमन सुन्न करणारी अशी ही खळबळजनक घटना आहे. प्राप्त माहितीनुसार गडचिरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गोकुलनगर येथे २७ जानेवारी २०२० रोजी फिर्यादीची १५ वर्षांची पीडित मुलगी नातेवाईकाच्या घरी जेवायला गेली असता पीडित मुलीचा नातेवाईक असलल्या आरोपी शंकर टिंगुसले याने सायंकाळी ६ वाजता दरम्यान तिला मासोळी आणायला बाजारात जाऊ असे सांगून बाजारात घेऊन गेला. तेथून परत येत असताना कामगार सोसायटी गोकुलनगरच्या मागे झाडाझुडपात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कोणाला काही सांगितले तर मी तुझ्या आईला, भावाला व तुला जादुटोणा करून मारून टाकेल, अशी धमकी दिली. २८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता पीडित दुकानात जात असताना आरोपीने तुझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. इकडे ये असे म्हणत घरात कोणी नसताना तिला घरात ओढत नेऊन, तोंड दाबून पुन्हा लैंगिक अत्याचार केले. पुन्हा तशीच धमकी दिली. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता शंकरची पत्नी दुकानात व पीडितेचा भाऊ घराबाहेर गेला असता त्याने घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन पुन्हा लैंगिक अत्याचार करून तिच धमकी दिली. या दरम्यान फिर्यादी नागपूर येथे कामानिमीत्त गेले असता व लॉकडाऊन असल्याने त्यांना यायला बरेच दिवस लागले. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती आढळुन आल्याने त्यांनी विचारणा केल्यावर तिने सगळा घटनाक्रम सांगितले. त्यानंतर ५ सप्टेंबर २०२० आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ६ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्र धरुन गुरुवार (ता. ९) आरोपी शंकर टिंगुसले याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी २५ वर्षे सश्रम कारावास व १ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्ह्राचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोरे यांनी केला.