ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २९ : नववी उत्तीर्ण झालेल्या एका अल्पवयीन मुलीला फिरते कपडे विक्रेत्यांनी पळवून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच धानोरा येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार सुनैना (काल्पनिक नाव) असून ही मुलगी नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. या मुलीचे सरासरी वय १४ वर्षे असल्याचे समजते. फिरते कपडे विक्रेत्याचे वय ५० वर्षाहून अधिक असल्याचे कळते. मात्र या व्यक्तीचे नाव पत्ता कुठल्याच ठिकाणी नाही नोंद नाही. ही मुलगी दुपारच्या सुमारास सोमवार (ता. २७) दुपारी अंदाजे २ वाजतानंतर घरी कोणीच नसताना निघून गेली. मुलगी कुठेतरी मैत्रीण व सबंधितांकडे गेली असेल ती सायंकाळपर्यंत येईल, असे आई-वडिलांना वाटले. मात्र सायंकाळची रात्र झाली तरी मुलगी घरी आली नाही. तेव्हा त्यांनी सर्वत्र शोध सुरू केला. त्यानंतर आई-वडील धानोरा पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी तक्रार नोंद करून रात्रभर शोध घेतला. अखेर पोलिसाच्या संशयावरून ५० वर्षांहुन अधिक असलेल्या कपड्या विक्रेत्यासोबत ही मुलगी पळून गेल्याचे समजले. कपडे विक्रेते हे दोन ते तीन महिन्यापासून एका चाळीत भाड्याने राहात असल्याची माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापूर्वी या ठिकाणी तीन व्यक्ती राहत होते. मात्र दोन व्यक्ती काही दिवसांपूर्वीच आपल्या गावाकडे निघून गेले. हे सर्व उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते. विशेष म्हणजे धानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी बाहेर राज्यातून उन्हाळ्यामध्ये अनेक व्यवसायिक काही महिन्यासाठी वास्तव्यात असतात. या ठिकाणी सर्व व्यावसायिक हे भाडेतत्त्वावरच भाड्याच्या रूममध्ये राहत असतात. रूम मालकांना आधार कार्ड इतर विचारपूस करूनच भाडेकरू ठेवणे अनिवार्य आहे. भाडेकरूची मुसाफिर नोंद पोलिस स्टेशनमध्ये करणेही आवश्यक आहे.मात्र हे होताना दिसत नाही. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीपासून तपास चक्रे फिरवलेली आहेत. पोलिसांच्या गुप्त माहितीनुसार चंद्रपुरात सोमवार (ता. २७)दोघेही दिसल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळताच धानोरा पोलिस विभागातील पोलिस कर्मचारी चंद्रपूरकडे रवाना झाले आहेत. वृत्त लिहेपर्यंत कुठलाही पत्ता लागलेला नाही. अधिक तपास धानोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहे.









