गडचिरोली, ता. ६ : सध्या तेंदू हंगाम सुरू असून तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी उकळण्यासाठी नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. अशाच प्रकारे तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावर तळ ठोकून बसलेल्या नक्षलवाद्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. पोलिसांच्या कडव्या प्रत्युत्तराला घाबरून नक्षलवादी पळून गेले. त्यांनी तेथे लपवून ठेवलेली स्फोटके नष्ट करून इतर साहित्य जप्त करण्यात आले.
टिपागड आणि कसनसूर दलमचे काही सशस्त्र कार्यकर्ते सावरगाव पोलिस स्टेशनअंतर्गत कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावर तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत, अशी विश्वसनीय माहिती बुधवार (ता. ५) दुपारी पोलिसांना मिळी. या माहितीच्या आधारे सावरगावजवळील महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील परिसराचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथकांनी माओवादविरोधी अभियान सुरू केले. संध्याकाळी उशिरा शोध सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलिस दलांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांच्या गोळीला गोळीनेच जोरदार प्रत्युत्तर दिले. तेव्हा घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी भागातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता तारा, बॅटरी, सोलर प्लेट्स, काही पिशव्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सुरक्षा दलांचे नुकसान करण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला आयईडी (स्फोटक) देखील ठेवण्यात आले होते. गुरुवार (ता. ६) सकाळी गडचिरोली येथून बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला पाठवण्यात आले. त्यांनी ही स्फोटके नष्ट केली. परीसरात आणखी शोध सुरू असून नक्षलवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सलग दोनदा नक्षलवाद्यांना पळवून लावत त्यांचे साहित्य जप्त केले आहे.









