जिल्ह्यातील सिंचनाची समस्या सोडवणार : डाॅ. नामदेव किरसान

152

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : धार्मिक ध्रुवीकरण करणारे, महागाई, बेरोजगारी वाढवून देशाच्या कारभाराचा बट्ट्याबोळ करणारे भाजप सरकार धुडकावून लावत जनतेने इंडिया आघाडीला चांगली साथ दिली. जनतेचे सहकार्य व तसेच काॅंग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परीश्रमामुळे मला विजय मिळाला. आता खासदार म्हणून सर्व प्रथम गडचिरोली जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न हाती घेणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित खासदार डाॅ. नामदेव किरसान यांनी दिली.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गुरुवार (ता. ६) जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या कार्यालयात घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परीषदेत डाॅ. नामदेव किरसान यांनी आपले पुढील नियोजन, जिल्ह्यातील समस्या, त्यावरील उपाययोजना, आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती, अशा अनेक बाबींची सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेला काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव चडगुलवार, कुसुम अलाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, अनेक वर्षानंतर काॅंग्रेस पक्षाला आपले खासदार मिळाले आहेत. ज्या प्रमाणे डाॅ. किरसान यांच्या विजयासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन, मन, धनाने मदत केली, तशीच मदत चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावी. पत्रकार परीषदेत संवाद साधताना डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, ही निवडणूक आगळ्या-वेगळ्या पद्धतीची होती. जाती, धर्माच्या नावावर ध्रुवीकरण झाले. मात्र काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने लोकांना जोडले. दुसरा टप्पा न्याय यात्रेचा झाला. त्यामुळे देशात प्रेमाचे व सकारात्मक वातावरण तयार झाले. सरकार विरोधात जनता एकत्र आली. भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली, भाजपचे लोक खोटे बोलतात हे जनतेच्या लक्षात आले. याशिवाय काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इंडिया आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड परीश्रम घेतले त्यामुळे हे यश मिळाले. त्यामुळे मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. भाजपचे अशोक नेते दहा वर्षे खासदार होते. पण त्यांनी येथील मूळ समस्या फारश्या सोडवल्या नाहीत. नवीन उमेदवार म्हणून माझ्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्या आहेत. पण या नद्यांतील पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे येथील शेतकरी खरीप हंगामात एकच पीक घेतात. मात्र सिंचनाच्या सुविधा निर्माण करून त्यांनी दोन ते तीन पिके घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय रोजगारनिर्मिती, लघु उद्योगासाठी प्रयत्न करी. इंडिया आघाडीने जाहीरनाम्यात पाच गॅरंटी दिल्या आहेत. केंद्रात आमचे इंडिया आघाडीचे सरकार आल्यास ही सगळी आश्वासने नक्की पूर्ण करू. पण गडचिरोली जिल्ह्यातील समस्या नक्की सोडवणार.ओबीसी जनगणनेसह आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटविण्यासाठी संसदेत झटणार असल्याचेही ते म्हणाले. काॅंग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत विरोध नसून गडचिरोली जिल्हा काॅंग्रेस गटबाजीमुक्त असल्याचेही ते म्हणाले. आमची इंडिया आघाडीची सरकार केंद्रात आल्यास आम्ही जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करू असेही ते म्हणाले.