कोट्यवधींच्या धान खरेदी अपहारात दोन अधिकारी अटकेत

169

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : येथील आदिवासी विकास महामंडळात झालेल्या ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपयांच्या अपहार प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचा कनिष्ठ सहायक व प्रादेशिक व्यवस्थापकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये व्यंकटी अंकलु बुर्ले ( वय ४६) कनिष्ठ सहायक. आदिवासी विकास महामंडळ व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी) रा. आष्टी ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, गजानन रमेश कोटलावार ( वय ३६) निलंबित प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, यवतमाळ व तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली रा. कुंदलवाडी ता. बिलोली जि. नांदेड यांचा समावेश आहे.

शेतक­ऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला आधारभूत किंमत देण्याकरिता शासन विविध योजना राबवते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांनी पिकवलेले धान विविध खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडुन बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जाते. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यासह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करून तयार होणार तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधिनस्त गोदामात जमा करण्यात येतो. जमा केलेल्या तांदळाच्या स्विकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतू, काही अधिकारी/कर्मचारी यात गैरप्रकार करून आपले आर्थिक हितसंबंध साधतात. गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोटअंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२३दरम्यान अपहार झाल्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. या चौकशीत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२३ दरम्यान एकूण ५९९४७. ६० क्विंटल धान खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष ३१५३२.५८ क्विंटल धान जावक झाला आहे. परंतु मिलर्सना दिलेल्या एकूण वितरण आदेशापैकी २८४१५. ०२ क्विंटल धान प्रति क्विंटल २०४० रुपये प्रमाणे ५, ७९, ६६, ६४० रुपयांचा मिलर्सना प्राप्त झाला नाही. तसेच गोदामात देखील शिल्लक नाही. त्याचप्रमाणे महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकूण बारदाण्यापैकी ७१०३८ नग प्रति नग ३२.७६ रुपये प्रमाणे २३, २७, २०४ रुपयांच्या बारदाण्यांचा असा एकूण ६, ०२, ९३, ८४५ रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. याकरिता तत्कालीन केंद्रप्रमुख, मार्कंडा (कं),आष्टी व्ही.ए.बुर्ले, विपनन निरीक्षक आर.एस.मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही. ए. कुंभार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जी.आर.कोटलावार जबाबदार असल्याचे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांच्या लेखी फिर्यादीवरून आष्टी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची गती तीव्र करून आरोपी व्यंकटी बुर्ले व गजानन कोटलावार यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासात राकेश सहदेव मडावी ( वय ३४) प्रतवारीकार, आदिवासी विकास महामंडळ, घोट यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे विचारपुस सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक सरीता मरकाम, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अंमलदारांनी केली आहे. या कारवाईकरिता आष्टी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सहकार्य केले. शेतक­ऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पिकांतही भ्रष्टाचार करून कोट्यवधींची मलाई लाटण्याचे हे प्रकरण सर्वत्र गाजत आहे.