एबीस कंपनीतील कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

117

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८ : तालुक्यातील बोरी येथे असलेल्या एबीस कंपनीमध्ये कोंबड्यांचे मोठे पोल्ट्रीफार्म असून येथील एका कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे या कंपनीच्या कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेवर शंका निर्माण केली जात आहे.

एबीस कंपनीच्या पोल्ट्रीफार्ममध्ये ३०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. येथे कोरची तालुक्यातील व छत्तीसगड राज्यातील काही युवकांना रोजंदारीवर नियुक्त करण्यात आले आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. २७ जून रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान या कंपनीत काम करणारे प्रशांत चोपडे (वय २५) व बुधराम सलामे (वय ३३) हे विद्युत फिटिंग चे काम करत असताना एका कर्मचाऱ्याने विद्युत प्रवाह सुरू केला. त्यामुळे प्रशांत चोपडे याला विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झा,ला तर बुधराम सलामे हा जखमी झाला आहे. मुख्य म्हणजे हे अतिशय धोक्याचे काम करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येत नाही. त्यामुळे या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्तीसगड राज्यातील बंजारी येथील रहिवासी प्रशांत चोपडे यांनी ३ वर्षांपूर्वी या कंपनीमध्ये रोजंदारीवर काम सुरू केले. २७ जून रोजी तो विद्युत जोडणीचे काम करीत असताना अचानक त्याला विजेचा जबर धक्का लागला व त्यामुळे प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांत व त्याचा भाऊ आपल्या आईसोबत बंजारी येथे राहत होते. प्रशांतचा भाऊ शेतीवर राबायचा. परंतु त्यामुळे आपला उदरनिर्वाह चालणार नाही हे लक्षात आले म्हणून प्रशांतने एबीस कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. विद्युत फिटिंगची कामे करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना रबरी हात मोजे, पायांचे बुट, हेल्मेट अशी सुरक्षा साधने पुरवली जातात. पण प्रशांतला यातील एकही सुरक्षा साधने पुरवण्यात आले नव्हते. किंबहुना येथील कुठल्याच कर्मचाऱ्याला अशी आवश्यक सुरक्षा साधने पुरवली जात नाहीत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रशांतच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोन वर्षापूर्वी प्रशांतच्या बहिणीचेसुद्धा निधन झाले होते. आता प्रशांतचाही असा हकनाक मृत्यू झाल्याने त्याच्या परीवारात फक्त त्याची आई आणि भाऊ दोघेच आहेत. त्याच्या आईच्या नशिबी पती, मुलगी आणि मुलाचा मृत्यू बघण्याचा भयंकर प्रसंग आला. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच त्या माऊलीने फोडलेला टाहो सर्वांचीच हृदये पिळवटून गेला.