-
गडचिरोली, ता. १ : स्थानिक गणेशनगर येथील शिवाजी शाळेजवळ असलेल्या गणेश मंदिरात किशोरवयीन मुली तसेच महिलांसाठी कार्यशाळा पार पडली.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेली आधारविश्व फाउंडेशन ही महिलांची संस्था त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाबद्दल नेहमीच चर्चेत असते. शनिवार २९ जून रोजी गणेशनगर येथील शिवाजी शाळेजवळील गणेश मंदिरात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शिका आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे होत्या. या कार्यशाळेत १३ ते १८ या वयोगटातील मुली व महिलांसाठी ही कार्यशाळा होती. या वयोगटातील मुलींमध्ये हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे शारीरिक तसेच मानसिक बदल होतात. त्याविषयी त्या अनभिज्ञ असतात. तसेच या वयातील मुलींचे पालक म्हणून त्यांची काय भूमिका असायला पाहिजे, मासिक पाळीमध्ये घ्यायची काळजी , याविषयी महत्त्वपूर्ण अशी कार्यशाळा गीता हिंगे यांनी घेतली. कार्यशाळेतील सर्व महिला सदस्यांना आधारविश्व फाउंडेशनतर्फे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. सोबतच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका अंजली कुळमेथे यांनी ध्यान आणि मुद्रा याविषयी मार्गदर्शन केले. संचालन वैष्णवी डोंगरे, तर आभार सीमा कन्नमवार यांनी मानले. यावेळी आधारविश्व फाउंडेशनच्या सचिव सुनिता साळवे, सदस्य प्रतीमा सोनवणे, भूमिका बरडे, भूमी कोंडावार तसेच आधारविश्वच्या इतर सदस्य व गणेशनगर येथील बहुसंख्य महिला व मुली उपस्थित होत्या.
—————————









