दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

93

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.११ : शासनाने सन २००५पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ६६८ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. याच क्रमात गुरुवार (ता.११) दोन जहाल महिला माओवादी प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, (वय ३६) रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा, जि. गडचिरोली वअखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, (वय ३४) रा. मरकेगाव ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले.

प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई सन २००५ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०११ पर्यंत कार्यरत होती.सन २०११-१४मध्ये वैरागड दलममध्ये,

२०१४-१५ मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये, २०१५ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये बदली होऊन सन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.सन २०१८ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती होऊन सन २०२१पर्यंत, सन २०२२ मध्ये डिके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये बदली होऊन पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण ४० गुन्हे दाखल असून त्यामध्ये २० चकमक, २ जाळपोळ व १८ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती सन २०१० मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१३ पर्यंत कार्यरत होती. सन २०१३-१४ मध्ये प्लाटुन नं. १५ मध्ये सदस्य पदावर, सन २०१४-१५ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये सदस्य पदावर, सन २०१५ मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये सदस्य पदावर, सन २०१८मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर बढती होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण ७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ चकमक, ४ खून, व १ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई हिच्यावर ८ लाख व अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिच्यावरही ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

ही कारवाई, पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील , पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल व जसवीर सिंग, कमांण्डट ११३ बटालियन सीआरपीएफ यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.