दारु विक्रेत्यांची धरपकड; तिघे ताब्यात

139

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. 3 : शहर पोलिसांनी दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र अवलंबविले आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी राबविलेल्या धाडसत्रादरम्यान दारु विक्रेत्यांची धरपकड सुरु आहे. याअंतर्गत शुक्रवारी, (दि.2) राबविलेल्या धाडसत्रात एक दुचाकीसह 2 लाख 35 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तिन दारु विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून दारुविक्रेते पित्रा-पुत्र फरार झाले आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौरभ सेन रा. गडचिरोली, वासुदेव मेश्राम रा. दिभना व संगीता खोब्रागडे रा. मोहझरी यांचा समावेश आहे. तर तालुक्यातील काटली येथील लालाजी बारसागडे व नरेश बारसागडे पिता-पुत्र फरारी आहेत. शहर पोलिसांच्या डिबी पथकाने ठाण्याअंतर्गत येत असलेल्या काटली चक गावातील लालाजी बारसागडे यांच्या घरी धाड टाकून 1 लाख 54 हजार रूपये किंमतीची देशी दारु जप्त केली. मात्र पोलिसांची भनक लागल्याने पिता-पुत्र पळून जाण्यात यशस्वी झाले. दुसरी कारवाई पोटेगाव मार्गावर करण्यात आली. यात सौरभ सेन यास दारु विक्री करतांना रंगेहाथ पकडून त्याचेकडून दुचाकीसह 7 हजार रूपये किंमतीची दारु असा एकूण 62 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. दिभना येथील वासुदेव मेश्राम यांच्या घरी धाड टाकून 16 हजाराची देशी-विदेशी दारु तर मोहझरी येथील संगीता खोब्रागडे घरुन 3 हजार 70 रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली. मागील काही दिवसांपासून गडचिरोली पोलिसांनी दारु विक्रेत्यांवर धाडसत्र आरंभिले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिस दला विषयी विश्वास व्यक्त केला जात आहे.

—————————