जिल्ह्यातून ८०० भाविक जाणार प्रभू श्रीरामाच्या अयोध्येला

122

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत ८०० भाविक सोमवार (ता. ७) अयोध्याकरिता रवाना होणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी रविवार ६ आॅक्टोबर रोजी पत्रकार परीषदेत दिली.

या पत्रकार परीषदेत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी म्हणाले की, देसाईगंज येथील रेल्वे स्थानकाहून भाविक पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या रेल्वेने जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार डाॅ. नामदेव किरसान, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैंने, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमवारी ही रेल्वे सकाळी ११ वाजता देसाईगंज स्टेशनवरून निघेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाराणसी येथे पोहचेल. तिथे विश्वनाथ मंदिर दर्शन, वाराणसी दर्शन आणि मुक्काम असेल. त्यानंतर ९ तारखेला सकाळी अयोध्या येथे पोहचेल. तिथे श्रीराम मंदिरात दर्शन घेणार आणि रात्री परतीचा प्रवास करेल. १० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता देसाईगंज स्टेशन येथे भाविक परत येतील. भाविकांसोबत वैद्यकीय चमू आणि समाज कल्याण विभागाचे कर्मचारी राहणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर रेडकार्पेट टाकण्यात आले आहे. रेल्वेला फुलांनी व फुग्यांनी सजविण्यात येणार आहे. तसेच प्रभू श्रीराम, माता सितेच्या वेशभूषेतील कलावंत भाविकांचे स्वागत करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

——————————————