डाॅ. देवराव होळी यांनी शक्तिप्रदर्शन करता पुन्हा भरला अर्ज

286

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २५ : भाजपचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी समर्थकांचा महामेळावा आयोजित करून हजारो समर्थकांसह शहराच्या मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालयापर्यंत रॅली काढत पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज २५ आॅक्टोबरला भरला. विशेष म्हणजे त्यांनी काल २४ आॅक्टोबरला गुरुपुष्यामृत योगावर आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता.

स्थानिक अभिनव लाॅन येथे आमदार डाॅ. होळी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीसह समर्थकांचा महामेळावा व महारॅली आयोजित केली. महामेळाव्याच्या मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे ,शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सह संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, भाजप जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे डॉ. तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, बंगाली आघाडीचे दीपक हलदर, प्रशांत भृगुवार, विलास दशमुखे, मारोतराव इचोडकर , शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार, भाजपच्या नेत्या प्रतिभा चौधरी, शहराध्यक्ष कविता उरकुडे यांच्यासह महायुतीचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी डाॅ. होळी यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत भाजपने त्यांना पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी केली. आपले मनोगत व्यक्त करताना डाॅ. होळी म्हणाले की, आपण मागील १० वर्षांपासून गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या केवळ विकासासाठी प्रयत्न करीत असून मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणारी विकासकामे केली आहेत. परंतु अजूनही मागास असलेल्या या जिल्ह्याचा मोठा प्रमाणावर विकास होण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता पक्षाने व जनतेने मला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे ते म्हणाले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आदिवासी नृत्य व बैलबंडीच्या जोड्यांनी सजलेली मिरवणूक काढून आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांची उपस्थिती होती.

—————————————-