ग्लोबल गडचिरोली न्यूज,
अहेरी, ता. १२ : तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायत हद्दीत वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये राहणारे शंकर चेरलावार यांचा माजी मालगुजारी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला एक आठवडा उलटत नाही तोच याच वाॅर्डातील बंडू सीताराम कुमरे (वय ५६) रा. वॉर्ड क्र. ३ अालापल्ली यांचाही त्याच तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (ता. १०) घडली. त्यामुळे परीसरात खळबळ उडाली आहे. मृत बंडू सीताराम कुमरे हे पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मागील वर्षी २०२३ ला एप्रिल महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते स्वागावी परतून दैनंदिन सामान्य जीवन जगत होते. मात्र रोजच्याच रस्त्याने फिरत असताना रस्त्या लागत असेलल्या तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला. आलापल्लीच्या तलावात वारंवार अशा घटना घडत असल्याने परीसरात तर्कवितर्कांना उत आला आहे. बंडू कुमरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, अविवाहित मुलगी व अविवाहित २ मुले, असा परीवार आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे परीसरात चर्चेला वेग आला आहे. बंडू कुमारे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी जेवण करून फिरायला निघाले होते. मात्र बराच वेळ झाल्यावरही घरी न परतल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. साधरण ३ तासानंतर घरच्यांना त्यांचा चष्मा व चप्पल तलावाच्या पाळीवर मिळाले. शंका आल्यावर त्यांनी तलावात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हाती काही लागले नाही. बुधवार (ता. ११) सकाळी पुन्हा शोध सुरू केला असता ७ वाजता कुमरे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. स्थानिकांच्या साहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.










