ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. १७ : राज्याच्या पोलिस महासंचालक शुक्ला यांनी मंगळवार (ता.१७) जिल्ह्यातील माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम पेनगुंडा गावाला भेट देत येथील नवनिर्मित पोलिस मदत केंद्राची पाहणी केली. तसेच लाहेरी उप पोलिस स्टेशनलाही भेट दिली.
पोलिस महासंचालक शुक्ला यांनी भामरागड उपविभागाअंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या पेनगुंडा पोलिस मदत केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली व उपस्थित अधिकारी तसेच अंमलदारांशी संवाद साधला. त्यानंतर पेनगुंडा येथील परीसरातील माआवोदविरोधी अभियानाबाबतचा आढावा घेत सर्व जवानांच्या राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. पोलिस महासंचालक शुक्ला यांच्या हस्ते पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्यात नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोअर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या, चप्पल, विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल, नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलिस महानिरीक्षक ( नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात अतिदुर्गम पेनगुंडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील १००० हून अधिक नागरीक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना पोलिस महासंचालक शुक्ला म्हणाल्या की, या नवीन पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलिस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. गडचिरोली पोलिस दल राबवत असलेल्या विविध योजनांचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच छत्तीसगड सीमेपासून अगदी जवळ महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटी असलेला पेनगुंडा हा भाग अतिदुर्गम जरी असला तरी, भविष्यात काही दिवसांमध्ये येथे रस्ते, आरोग्यसेवा आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच या अतिसंवेदनशील भागामध्ये सर्व अधिकारी व जवानांनी येथील नागरिकांसोबत एकजुटीने राहून आपले कर्तव्य पार पाडावे व येत्या काळात आम्ही माओवाद संपवून गडचिरोली जिल्ह्याचा विकास करू असेही सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यासोबतच जवानांचे मनोबल उंचाविण्याकरीता आणि पेनगुंडा येथे बडाखाण्याचे आयोजन करण्याकरिता त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षिस दिले. यावेळी उपस्थित असलेले भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, प्राणहिता सी-६० चे पोलिस अंमलदार श्रीराम सोरी यांचा वाढदिवस असल्याने पोलिस महासंचालक शुक्ला यांनी त्यांच्यासोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. लाहेरी उप पोलिस स्टेशन येथे भेट देत परिसरातील माआवोदविरोधी अभियानाबाबतचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखिव पोलिस दलाच्या ११३ बटालियनचे कमाडंण्ट जसवीर सिंग, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे आदी उपस्थित होते.
————————————-