ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १ : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेऊन आला आहे. विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकीकरणाच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी बुधवार (ता. १) येथे व्यक्त केला. 
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देत विकासाचे नवे पर्व प्रारंभ केले. त्यांच्या उपस्थितीत वरीष्ठ कॅडरची जहाल माओवादी ताराक्कासह ११ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. त्यात दोन दाम्पत्य आहेत. या ११ जणांवर महाराष्ट्रात सर्व मिळून १ कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारनेसुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीची प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहे. ३४ वर्षांपासून ताराक्का माओवादी चळवळीत होती. ३ डिव्हिजन किमिटी मेंबर तर १ उपकमांडर, २ एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात ६ माओवादी ठार झाले. २०२४ या वर्षांत २४ माओवादी ठार झाले आणि १८ माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या ६ महिन्यात १६ जहाल माओवादी आणि आज ११ असे २७ जण शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलिस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने मावोवाद्यांची शरणागती सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचे काम होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शरणागत माओवाद्यांमध्ये वरीष्ठ जहाल माओवादी विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ वत्सला ऊर्फ ताराक्का, (डिकेएसझेडसीएम, डिके मेडीकल टिम इंचार्ज) (वय ६२) रा. किष्टापूर, ता. अहेरी, जि. गडचिरोली, सुरेश बैसागी ऊईके ऊर्फ चैतू ऊर्फ बोटी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)) ( वय ५६), रा. पल्ले, ता. भामरागड, जि. गडचिरोली, कल्पना गणपती तोर्रेम ऊर्फ भारती ऊर्फ मदनी (डिव्हीसीएम, कुतूल एरीया कमिटी (डॉक्टर/कृषी विभाग)) (वय ५५) रा. किष्टापूर ता. अहेरी, जि. गडचिरोली, अर्जुन तानू हिचामी ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश (डिव्हीसीएम, राही दलम) (वय ३२), रा. झुरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, वनिता सुकलू धुर्वे ऊर्फ सुशिला, (एसीएम, भामरागड दलम) (वय ३१), रा. चिमरीकल, ता. धानोरा, जि. गडचिरोली, सम्मी पांडू मट्टामी ऊर्फ बंडी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) ( वय २५), रा. बेरेलटोला, ता. पाखांजूर, जि. नारायणपूर (छत्तीसगड), निशा बोडका हेडो ऊर्फ शांती (उप-कमांडर, पेरमिली दलम) ( वय ३१), रा. मेंढरी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, श्रुती उलगे हेडो ऊर्फ मन्ना (सदस्य, कंपनी क्र. १०) ( वय २६) रा. मोहंदी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, शशिकला पत्तीराम धुर्वे ऊर्फ श्रुती (सदस्य, पश्चिम सब झोनल प्रेस टिम) (वय २९) रा. कोसमी नं. १, ता. धानोरा, जि. गडचिरोली, सोनी सुक्कू मट्टामी (सदस्य, राही दलम) ( वय २३) रा. टेकामेट्टा, ता. पाखांजूर, जि. नारायणपूर (छत्तीसगड) व आकाश सोमा पुंगाटी ऊर्फ वत्ते (सदस्य, प्लाटुन क्र. ३२ (नीब)) (वय २०) रा. मेतावाडा, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छत्तीसगड)यांचा समावेश आहे. सर्व शरणागत माओवाद्यांना संविधान भेट देत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे २२ जून २०२४ रोजी गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी आणि सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री (आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्या समोर शरणागती पत्करल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परीक्षेत्र डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सीरआपीएफचे पोलिस उप महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते. १७ जुलै २०२४ रोजी पोलिसांच्या विशेष अभियान पथकातील जवानांनी छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावाजवळील जंगल परिसरात १२ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालुन संपूर्ण उत्तर गडचिरोलीतील सर्व सशस्त्र माओवादी संघटनेचा नायनाट केला होता. या कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभियानात सहभागी सी-६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. या बक्षिसाच्या रक्कमेतून सी-60 जवानांना माओवादविरोधी अभियानात उपयोगात येणाया साहित्यांच्या किटचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाया विशेष अभियान पथकातील जवानांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. यासोबतच कोपर्शी चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी त्या बसमधून प्रवासही केला. अतिदुर्गम पेनगुंडा येथील गडचिरोली पोलिस, सीआरपीएफ, एसआरपीएफ व सी-६० च्या जवानांसोबत संवाद साधला. गडचिरोली येथील कार्यक्रमादरम्यान गडचिरोली पोलिस दलासाठी पवनहंस कंपनीकडून उपलब्ध असलेल्या एएलएच हेलीकॉप्टरच्या सुरक्षेसाठी नवीन तयार करण्यात आलेल्या हॅंगरचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली पोलिस दलातील जवानांचे असीम शौर्य व त्यागाबाबतच्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेले सन २०२५ चे टेबल कॅलेंडरचे प्रकाशन व गडचिरोली पोलीस दलास माओवादविरोधी अभियान व चार्ली पेट्रोलिंगकरिता प्राप्त १९ चारचाकी व ३० दुचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
——————————-









