तिने नदीत उडी घेतली पण पोलिसांनी वाचवले

123

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २ : येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारलेल्या महिलेचे प्राण वाचवून देसाईगंज पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यतत्परतेचे दर्शन घडविले.

नवीन वर्षाची सुरुवात होताना देसाईगंज शहरात व परीसरात अनुचित घटना घडू नये, यासाठी देसाईगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप आगरकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह विर्शी टी पॉइंट परीसरात गस्त घालत असताना सायंकाळी ७ वाजता त्यांना नदीच्या पुलावरून एका महिलेने उडी घेतली, अशी माहिती मोबाईलवर मिळाली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पोलिस निरीक्षक संदीप आगरकर ताफ्यासह नदीपात्राजवळ पोहचले. नदीच्या पाण्यात एक महिला वाचवा वाचवा अशी ओरडत असताना पोलिस निरीक्षक आगरकर स्व:ता पाण्यात उतरले. त्यांनी महिलेला पाण्याबाहेर काढून पोलिस वाहनात बसवले व तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. ईकबाल बेग यांनी या महिलेवर उपचार सुरू केले. महिलेचे नाव नेहा कुलदीप मेश्राम (वय २८) असून ती देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील रहिवासी असल्याची ओळख पटल्यावर पोलिसांनी तिच्या पतीला या घटनेची माहिती देऊन रुग्णालयात बोलावून घेतले. या महिलेच्या कंबरेला व पायाला इजा झाल्याने पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नदीपात्रात उडी घेतलेल्या नेहाला पाण्याबाहेर काढताना प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप आगरकर यांच्यासह पोलिस हवालदार जीवन हेडाऊ, दिनेश राऊत, विलास बालमवार, मोरेश्वर चन्ने, जस्पाल चावला, पंकज डाकराम, मेश्राम यांनी मदत केली. पोलिस निरीक्षक आगरकर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

———————-