ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : जिल्ह्यातील गरजू युवक-युवतींना पोलिस दलात रोजगाराची संधी देऊन नोकरी मिळविण्याकरिता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील युवांकरिता पोलीस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षणाचे आयोजन गडचिरोली पोलिस मुख्यालय येथे करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण ५ डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ पर्यंत एकूण ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलिस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या १० व्या सत्रामध्ये १२० युवकांनी आपला सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत गडचिरोली पोलिस मुख्यालय तसेच पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र स्तरावरून घेण्यात आलेल्या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहिवासी असलेल्या एकूण २०८० युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामधून २०५ जणांची पोलिस / एसआरपीएफमध्ये निवड झाली आहे. या निरोप समारंभ कार्यक्रमास पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले १२० प्रशिक्षणार्थी उमेदवार हजर होते. या प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने लोअर, टी-शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरिता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले. या प्रशिक्षणा अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या युवकांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन वरीष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यादरम्यान प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी पोलिस भरतीमध्ये यशस्वी होण्याची आशा व्यक्त करून गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले आहेत.समारोपीय कार्यक्रमात अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आगामी पोलिस भरतीमध्ये जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने परिश्रम करून यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी देखिल सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके, सर्व पोलिस अंमलदार व कवायत निर्देशकांनी सहकार्य केले.
——————————-









