दोन जहाल महिला माओवादी आल्या शरण

72

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. ८ : माओवादी चळवळ बरीच कमकुवत झाली असून बुधवार (ता. ८) दोन जहाल महिला माओवाद्यांनी पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलापुढे शरणागती पत्करत या चळवळीला आणखी एक धक्का दिला आहे. शामला झुरू पुडो ऊर्फ लीला, कंपनी क्र. १० पीपीसीएम/सेक्शन कमांडर ( वय ३६) रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व काजल मंगरू वड्डे ऊर्फ लिम्मी, भामरागड दलम सदस्य ( वय २४) रा. नेलगुंडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली अशी शरणागत महिला माओवाद्यांची नावे आहेत.

शामला झुरु पुडो ऊर्फ लीला ही २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रूपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. तिने सन २००२ मध्ये चामोर्शी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन काम केले. सन २००२ मध्ये प्लाटून क्र. ३ मध्ये बदली होऊन सन २००७ पर्यंत काम केले, सन २००७ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन सन २००८ पर्यंत काम केले. सन २००८ मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. ४ मध्ये सन २०१० पर्यंत काम केले. सन २०१० मध्ये कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन सेक्शन कमांडर या पदावर राहुन आजपावेतो काम केले. तिच्यावर आजपर्यंत एकूण ४५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २१ चकमक, ६ जाळपोळ व १८-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी जानेवारी २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकूण ८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ४- चकमक, १- जाळपोळ व ३- इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिच्यावर८ लाख रुपयांचे, तर काजल मंगरू वड्डे ऊर्फ लिम्मी हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना शरणागतीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकुण ४६ जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सन-२०२५ च्या पहिल्याच आठवड्यात १३ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. या १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ११ वरीष्ठ कॅडरच्या माओवाद्यांचाही समावेश होता. शरणागतीबाबतची कारवाई पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीरआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

————————————–