ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : गारठवणीरी थंडी निरोप घेत असून सूर्य नारायणाचे उत्तरायणाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून वाराही जरा वेगवान झाल्याने सगळ्यांना मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत. मकर संक्रांत आणि पतंगाचे अतुट नाते आहे. मात्र अलिकडे पतंग उडवण्यासाठी धातुमिश्रीत मांजा बाजारात येत असून या मांजाचा स्पर्श तारेला झाल्यास पतंग उडवणारे बालक किंवा व्यक्ती प्रसंगी प्राण गमावू शकते. त्यामुळे पतंगप्रेमींना सावधगिरीचा इशारा देताना पतंग उडवताना काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे.
मकर संक्रांतीची चाहूल लागताच निळ्या आकाशात पतंग उंच भरारी घेताना शहरात दिसत आहेत. बालकांसह ज्येष्ठ मंडळी पतंग उडवण्याची मौज लुटतात. मात्र पतंग उडवताना पतंगाचा मांजा वीजखांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे. शहरी व ग्रामीण भागात विद्युत वितरणसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. मात्र पतंग उडवताना या यंत्रणांपासून दूर राहावे. पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावे. विद्युत वाहिन्या, वीजखांबावर अडकलेले पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. कारण विद्युत वाहिन्यांचे एकमेकांवर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवर रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा असेही मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी आवाहन केले आहे. विद्युत वाहिन्यांचे अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातूमिश्रित मांजाचा वापर टाळावा कारण धातू मिश्रित मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहित होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो. तसेच वीज वाहिन्यांच्या दोन खांबांच्या मधे वीज वाहिन्यांत अडकलेले पतंग काढता येत नाहीत. त्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत होऊन ताराला तार भिडल्याने होल्टेज वाढू शकते आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच घराबाहेर सायकल किंवा मोटारसायकल घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचा पतंगाच्या मांज्यामुळे गळा चिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा; जेणेकरून तत्काळ वीजपुरवठा खंडित करून तातडीची मदत करणे सोयीचे होईल, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे.
——————————–









